नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नवी मुंबईतील सिडकोच्या पाच हजार आणि महापालिकेच्या १,१२५ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, लाेकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे केले. यात घणसोली-ऐरोली खाडीपूल, सिडकोचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, विमानतळास जोडणारा पूल, अटल सेतू ते उलवे जंक्शन सागरी मार्गासह खारघर-तुर्भे जोडमार्गाचा समावेश आहे. यात तुर्भे ते खारघरपर्यंतच्या भुयारी मार्गाचा अर्थात बोगद्याचाही समावेश आहे.
ही कामे येत्या तीन-चार वर्षांत पूर्ण होणार आहे. या मार्गांमुळे नवी मुंबईकरतील नागरिकांचा प्रवास सुसाट होणार असून, त्यांचा वेळ, इंधनाची बचत, वायू, ध्वनी प्रदूषणसुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे.
५.४९ किमीचा खारघर-तुर्भे लिंक रोड
खारघर-तळोजाला नवी मुंबईतील वाशी, तुर्भे, जुईनगर, नेरुळ, एपीएमसी मार्केट, टीटीसी औद्याेगिक वसाहत यांना जोडणाऱ्या ५.४९ किमीचा खारघर-तुर्भे लिंक रोडचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केले. यात तुर्भे ते खारघरदरम्यान पारसिक डाेंगराखालील १.७६ किमीच्या बोगद्याचाही समावेश आहे. या कामाची चार वर्षांची डेडलाईन आहे. सुमारे ३,१६६ कोटी रुपये यावर खर्च होणार आहेत.
घणसोली-ऐरोली दरम्यान सहा पदरी पूल
घणसोली-ऐरोली दरम्यान ६ पदरी खाडीपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या ठाणे-बेलापूरवरून जे अंतर कापण्यासाठी १६ मिनिटे लागतात ते ५ मिनिटांवर येणार आहे. या कामासाठी ४९२ कोटी खर्च हाेईल.
नवी मुंबई विमानतळाला जोडणारा मार्ग
अटल सेतू जंक्शनपासून ते आम्र मार्ग जंक्शनपर्यंत उलवे सागरी मार्ग बांधणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी मार्गिका १.२ किमी आहे. या रस्त्यासाठी ९१२ कोटी रुपये खर्च होणार आहेत.