नवी मुंबई : येथील जेएनपीटी बंदरातील तस्करी थांबायचे नाव घेत नसून बुधवारी सीमा शुल्क विभागाने खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एका कंटेनरची तपासणी केली असता त्यात १२ मेट्रिक टन झाडू, ब्रश आणण्याच्या नावाखाली ई- सिगारेट्स, ई- सिगारेट्सच्या रीफिल, खेळण्यांसह ब्रँडेड सौंदर्यसाधने असा तीन कोटींचा ऐवज आढळला. हा सर्व मुद्देमाल सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी सील केला आहे.
गेल्याच आठवड्यात याच बंदरात अनब्रॅन्डेड पाकिटांमध्ये मोबाइल ॲक्सेसरीज सापडल्या. यात सॅमसंग, ॲपल, बोट, विवो, मोटोरोला, एचटीसी, रिअलमी कंपनीचे बॅक पॅनल, ॲडाप्टर, एअर पॉड असा साडेतीन कोटी रुपयांचा ऐवज सील केला होता. तत्पूर्वीही झेब्राच्या कातड्यासह प्रसिद्ध चित्रकारांची दुर्मीळ चित्रे जप्त केली हाेती. तसेच नवी मुंबई, दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी या बंदराच्या परिसरातील काही कंटेनर यार्डमधून शेकडो कोटींचे अमलीपदार्थ जप्त केलेले आहेत. यामुळे या बंदरातील तस्करी दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.