'त्याने' दिले चक्क सापाच्या ८१ पिल्लांना जीवदान; २४ दिवस अंड्यांची घेतली विशेष काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 10:26 AM2024-04-23T10:26:06+5:302024-04-23T10:26:22+5:30
सापाची आढळलेली ८१ अंडी उबविण्यासाठी एक डब्यामध्ये ठेवली. त्यामध्ये कोकोपीट टाकून डब्यात ऑक्सिजन जाण्यासाठी काही ठिकाणी छिद्रे केली
नवी मुंबई : उलवे येथील बांधकाम साइटवर २९ मार्चला सापाची ८१ अंडी सापडली होती. सर्पमित्र अक्षय डांगे यांनी सर्व अंडी सुखरूप ठिकाणी ठेवून २४ दिवस त्यांची विशेष काळजी घेतली. प्रजननानंतर दिवड जातीच्या सापाच्या ८१ पिल्लांना त्यांनी सुखरूपपणे जंगलात सोडले.
इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मजुरांना दिवड जातीचा साप दिसला. बांधकामासाठी सुरू असलेल्या हालचालीमुळे तो तेथून निघून केला. त्या ठिकाणी त्याची अंडी दिसली. काही दक्ष नागरिकांनी सर्पमित्र अक्षय डांगे यांना सांगितले. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता अंडी अत्यंत नाजूक होती. ती ताब्यात घेऊन एका डब्यात सर्व अंडी उबविण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यांच्यावर नियमित लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. २४ दिवसांनंतर सर्व ८१ अंड्यांमधून साप सुखरूप बाहेर आले.
अशी उबविली अंडी...
सापाची आढळलेली ८१ अंडी उबविण्यासाठी एक डब्यामध्ये ठेवली. त्यामध्ये कोकोपीट टाकून डब्यात ऑक्सिजन जाण्यासाठी काही ठिकाणी छिद्रे केली. २४ दिवस सातत्याने ३० डिग्री तापमान राहील याची काळजी घेतली. योग्य तापमान ठेवल्यामुळे सर्व अंड्यांमधून पिल्ले सुखरूप बाहेर येऊ शकली.
बांधकामाच्या ठिकाणी आढळलेली अंडी सुखरूप घरी नेऊन ती योग्य तापमानात उबविण्याची प्रक्रिया पार पाडली. सर्व ८१ अंड्यांतून दिवड सापाची पिले सुखरूपपणे बाहेर आल्याचे समाधान आहे. सर्व पिल्लांना सुरक्षित अधिवासात सोडले आहे. -अक्षय डांगे, सर्पमित्र