"... म्हणून आम्हाला नुकसान भरपाई द्या!", सदनिकाधारकांचा सिडको मुख्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 06:12 PM2024-07-05T18:12:20+5:302024-07-05T18:13:19+5:30

या मोर्चात शेकडोंच्या संख्येने अधिक लाभार्थी सहभागी झाले होते.

"... So give us compensation!", Tenants march at CIDCO headquarters | "... म्हणून आम्हाला नुकसान भरपाई द्या!", सदनिकाधारकांचा सिडको मुख्यालयावर मोर्चा

"... म्हणून आम्हाला नुकसान भरपाई द्या!", सदनिकाधारकांचा सिडको मुख्यालयावर मोर्चा

पनवेल : सिडकोच्या तळोजा सेक्टर ३४ आणि ३६ येथील गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना वेळेत घरांचा ताबा दिला गेला नसल्याने या लाभार्थ्यांना घराचे हप्ते ,घर भाडे भरावे लागले. यामुळे या लाभार्थ्यांवर आर्थिक संकट ओढवले असल्याने याबाबत सिडकोने नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शुक्रवार दि.५  रोजी कॉलनी फोरमच्या वतीने सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चात शेकडोंच्या संख्येने अधिक लाभार्थी सहभागी झाले होते. फोरमच्या अध्यक्षा माजी नगरसेविका लीना गरड,समन्वयक मधु पाटील,ऍडव्होकेट बालेश भोजने यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांसाठी परवडणाऱ्या घरांसाठी संधी देत सिडको महामंडळाने तळोजा फेज दोनमधील सेक्टर ३६ मध्ये जवळपास सात हजार सदनिका असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम पूर्ण केले आहे. 

सिडको महामंडळाने २०१९ मध्ये सोडतीमधून अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. दरम्यान, कोरोनाची साथ असल्यामुळे सिडको मंडळाने २०२० मध्ये गृहकर्जाची प्रक्रिया पूर्ण करून मार्च २०२३ मध्ये सदनिकांचा ताबा देऊ, असे आश्वासन दिले होते. दरम्यान, गेल्या तीन वर्षांत सदनिकाधारकांनी अनेक वेळा मोर्चा,आंदोलन केल्यामुळे सिडकोने काही दिवसांपूर्वी घरांचा ताबा देण्यास सुरुवात केली आहे, मात्र सदर सोसायटीमधील समस्या कायम आहेत.सोसायटीत पाणी जोडणी केलेली नसून मलनिस्सारण वाहिन्यांचे काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले आहे. 

लाभार्थी २०२० पासून घराच्या कर्जाचे हप्ता भरत आहेत. एकीकडे सिडकोच्या घराचा हप्ता, तर दुसरीकडे वास्तव्य करीत असलेल्या घरांचे मासिक भाडे देताना तारेवरची कसरत लाभार्थीधारकांना करावी लागत आहे. त्यामुळे सदनिकाधारकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तीन वर्षांपासून लाभार्थ्यांना गृहकर्जाचे हफ्ते भरावे लागत आहेत. त्याचीच नुकसानभरपाई मिळावी यासाठी लाभार्थीच्या वतीने शुक्रवारी सिडकोवर हा मोर्चा काढण्यात आल्याचे लीना गरड यांनी सांगितले. विधानपरिषदेत आमदार सचिन अहिर यांनी हा विषय औचित्याचा मुद्दा म्हणून उपस्थित केला.

मोर्चाचे सात लोकांचे शिष्टमंडळ यामध्ये माजी नगरसेविका लीना अर्जुन गरड, मधु पाटील, विजय रोकडे, विशाल पवार, सुहास पाटील, स्वप्नील पारटे, एस धम्मपाल एडवोकेट बालेश भोजने यांनी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल आणि मुख्य अभियंता के भयस व मार्केटिंग विभागाचे श्रीनिवास मोकलीकर या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.
 

Web Title: "... So give us compensation!", Tenants march at CIDCO headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल