...म्हणून फ्लेमिंगोंचा मृत्यू; सिडकोकडून वनविभागास दिलेल्या वचननाम्याचे उल्लंघन
By नारायण जाधव | Published: May 3, 2024 04:23 PM2024-05-03T16:23:35+5:302024-05-03T16:23:45+5:30
सिडकोच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळेच काही फ्लेमिंगो पाम बीच रोडवरदेखील येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
नवी मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने संरक्षित असलेल्या डीपीएस फ्लेमिंगो तलावात येणाऱ्या भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखणार नाही, तसेच खारफुटीची कत्तल होणार नाही, या वनविभागाला हमीपत्राद्वारे स्वत:च्या वचननाम्याचे सिडकोने सरासर उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. यामुळेच हा कोरडापडून परिसरात फ्लेमिंगोंचे मृत्यू होत असल्याचा दावा करून याबद्दल पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
सिडकोच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळेच काही फ्लेमिंगो पाम बीच रोडवरदेखील येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात सिडकोने वनविभागाला दिलेल्या हमीपत्राचा महत्त्वाचा दस्तऐवज नॅटकनेक्ट फाउंडेशनने उघड केला आहे ज्यामध्ये सिडकोने नेरूळ जेट्टीच्या बांधकामात भरतीचे पाणी रोखणार नाही, असे आश्वासन दिले होते.
सिडकोचे तत्कालीन कार्यकारी अभियंता एम. के. महाले यांनी दि. २७ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रवासी जलवाहतूक टर्मिनल प्रकल्पाच्या बांधकामासाठी ०.४६ हेक्टर खारफुटी वळती करण्यासाठी मंजुरी मिळण्याच्या विशिष्ट हेतूंसाठी हे हमीपत्र दाखल केले होते. महाले, आता निवृत्त झाले आहेत, त्यांनी खारफुटीच्या वळती करण्यासाठी वनविभागास दिलेल्या हमीपत्रावर स्वाक्षरी केल्याची पुष्टी केली, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले.
खारफुटीचे क्षेत्र वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने ही मंजुरी बंधनकारक होती. यानंतर नॅटकनेक्टने ही गंभीर बाब सिडकोचे मुख्य अभियंता एन. सी. बायस यांच्या निदर्शनास आणून तातडीने भरतीच्या पाण्याचे इनलेट साफ करण्याची विनंती केली आहे. “कोविडच्या आधी तलावाच्या दक्षिणेकडील एका मोठ्या वाहिनीवरून भरतीचे पाणी तलावात शिरताना दिसायचे,” असे नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्व्हेशन सोसायटीचे संदीप सरीन यांनी सांगितले.
इनलेट अडवण्याचा गैरप्रकार कोविकाळा खंडित झाल्याचे ते म्हणाले. नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्व्हेशन सोसायटीने दाखल केलेल्या २०१३ च्या जनहित याचिका क्रमांक २१८ मध्ये, उच्च न्यायालयाने सिडकोने डीपीएस तलावात खाडीचे पाणी येईल, प्रवाह रोखला जाणार याची खात्री करावी, असा निर्णय दिला होता.
सागर शक्तीचे प्रमुख नंदकुमार पवार म्हणाले, सिडकोने डीपीएस तलावात येणारा भरतीचा प्रवाह रोखल्याने फ्लेमिंगो आहाराच्या शोधात विचलित होऊन त्यांची वाट चुकल्यानेच त्यांचे मृत्यू होत आहेत. तर सेव्ह फ्लेमिंगोज अँड मँग्रोव्हजच्या रेखा सांखला म्हणाल्या की, पक्षी विचलित होत असल्याने त्यांना दुखापत होत असल्याचे आमचे निरीक्षण आहे. त्यांचे निवासस्थान, म्हणजे डीपीएस तलावात कोणत्याही परिस्थितीत पाण्याच्या प्रवाहाचे पुनरुज्जीवन केले पाहिजे.