स्वखर्चाने खड्डे भरून जपली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 02:15 AM2017-10-05T02:15:56+5:302017-10-05T02:16:13+5:30
नेरळ साई मंदिर आणि बस स्थानक परिसरात रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे.
नेरळ : नेरळ साई मंदिर आणि बस स्थानक परिसरात रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथून जाणाºया प्रवाशांना आणि नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेत कोल्हारे ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष विजय हजारे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने खड्डे भरून सामाजिक बांधिलकी जपल्याने त्यांचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.
अरुंद रस्ता आणि खड्ड्यांमुळे झालेला त्यांच्या भावाचा अपघाती मृत्यू यामुळे गेल्या नऊ वर्षांपासून रस्त्यावर पडलेले खड्डे स्वखर्चाने भरण्याचे काम सामाजिक बांधिलकी जपत पूर्ण करत आहेत. आपल्या भावाचा रस्त्याच्या अरुंदपणामुळे व केवळ रस्त्यात खड्डे असल्याने २००८ मध्ये अपघातात मृत्यू झाला. हे लक्षात घेवून या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हजारे हे गेली नऊ वर्षे कोल्हारे हद्दीतील रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम स्वखर्चाने करत आहेत.
पावसात रस्त्याची अवस्था खूप दयनीय झाली आहे, यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वेळोवेळी अपघातात चालकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याच भागात नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने रु ग्णांना नेताना वेळेवर पोहचता येत नसल्याने रुग्ण व गाडी चालकाला याचा त्रास सहन करावा लागत आहे.