नवी मुंबई- इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत महानगरपालिकेने वाशी सेक्टर १० मधील मिनी सीशोअर येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. यावेळी २०० पेक्षा जास्त तृतीयपंथी नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदविला.
नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये शहरातील सर्व सामाजीक संघटनांसह सर्व घटकांना सहभागी करूण घेण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून लेट्स सेलेब्रेट फिटनेस संस्थेच्या सहयोगाने स्वच्छता कार्यात आमचाही सहभाग हा उपक्रम राबविण्यात आला. तृतीयपंथी नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन खाडीकिनारा स्वच्छ केला.पहिल्यांदाच स्वच्छता अभियानामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या सहभागामुळे इतर नागरिकांनाही स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, वाशीचे विभाग अधिकारी दत्तात्रय घनवट, लेट्स सेलेब्रेट फिटनेसच्या रीचा समीत व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छता अभियानात नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमात तृतीयपंथी नागरिकांना सहभागी करून स्वच्छतेविषयी जनजागृती केली - रिचा समीत, सामाजिक कार्यकर्त्या
नवी मुंबईचा स्वच्छतेमध्ये पहिला नंबर आला पाहिजे. कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी व जनजागृतीसाठी स्वच्छता अभियानात सहभागी झालो आहोत - शोभना