मासळी मार्केटमध्ये सामाजिक अंतराचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:13 AM2020-10-10T00:13:35+5:302020-10-10T00:13:43+5:30
घणसोलीतील स्थिती; मासिक भाडे भरणाऱ्या महिलांचा व्यवसाय धोक्यात
नवी मुंबई : घणसोली गावातील मासळी बाजारात महापालिकेने काही मासळी विक्रेत्यांना व्यावसायिक गाळे मासिक भाड्याने दिलेले आहेत, तर काहीना ओटे बांधून दिले असून, त्या ठिकाणी मासळी विक्रेत्या महिलांना जागेची अडचण असल्याने मार्केट सोडून बाहेर विक्रीसाठी बसावे लागते. आठवड्यातील तीन दिवस या मार्केटमध्ये मासळी खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्यामुळे, कोरोनाच्या काळात सामाजिक अंतरांच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळते.
या मासळी मार्केटच्या आवारात महापालिकेने ६७४ चौ.फूट क्षेत्रफळाचे प्रत्येकी एकूण ९ व्यावसायिक गाळे बांधले आहेत, तर मार्केटच्या आतमध्ये १८ ते २० ओटले बांधून दिले आहेत. तीन वर्षांपूर्वी या गाळ्याचे मासिक भाडे केवळ २२५ रुपये होते. गेल्या दोन वर्षांपासून २,७५० रुपये मासिक भाडे आकारले जाते. म्हणजे दोन वर्षांत थेट २,५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सुविधा मात्र काहीच नसल्याचे गाळेधारकांचे म्हणणे आहे, तर मार्केटच्या आत महापालिकेने १८ ते २० ओटले बांधले आहेत. त्यांना मासिक भाडे नाही, असे गाळेधारकांचे म्हणणे आहे. असे असतानाही अनेक विक्रेत्या महिला ओटे दिलेल्या ठिकाणी न बसता गाळे असलेल्या ठिकाणी, तसेच रस्त्यावर व्यवसाय करीत असल्याने गाळे उघडण्यास नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची या महिलांची तक्रार आहे. मासिक भाडे भरणाºया महिलांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्यामुळे त्यांची बसण्याची सोय महापालिकेने अन्यत्र करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मासळी मार्केट आवारात आठवड्यातील बुधवार, शुक्रवार आणि रविवारी मासळी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने, सरकारच्या सोशल डिस्टन्सच्या नियमांचा अक्षरश: फज्जा उडाल्याचे चित्र घणसोली परिसरात पाहावयास मिळते.
पालिकेचे दुर्लक्ष : मासळी विक्रीसाठी ज्यांना महापालिकेने ओटले वाटप केले आहेत, त्यांनी त्याच ठिकाणी बसावे, जेणेकरून मासिक भाडे भरणाºया मासळी विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही. अशी तक्रार घणसोली विभाग अधिकाऱ्यांकडे करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची टीका होत आहे.