‘लोकमत’च्या वतीने आज सामाजिक वैद्यकीय परिषद
By admin | Published: May 6, 2017 06:30 AM2017-05-06T06:30:53+5:302017-05-06T06:30:53+5:30
‘लोकमत’ आयोजित सामाजिक वैद्यकीय परिषद शनिवार, ६ मे रोजी सानपाडा येथे दुपारी ३ ते ६ दरम्यान केमिस्ट भवनमध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ‘लोकमत’ आयोजित सामाजिक वैद्यकीय परिषद शनिवार, ६ मे रोजी सानपाडा येथे दुपारी ३ ते ६ दरम्यान केमिस्ट भवनमध्ये होणार आहे. या बैठकीत शासकीय अधिकारी, डॉक्टर्स, औषध विक्रेते तसेच वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ यांच्यात जेनेरिक औषधांसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयावर चर्चा घडवून आणली जाणार आहे.
डॉक्टरांनी रुग्णांना औषधे सुचविताना जेनेरिक औषधांना प्राधान्य द्यावे, तसेच हृदयरोगावरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या स्टेंटच्या किमतीवर निर्बंध घालण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. काही ठिकाणे वगळता अनेक ठिकाणी जेनेरिक औषधांची पुरेशी उपलब्धता झालेली नाही. तर जेनेरिक औषधांवर छापील किंमत जास्त असल्याने ती कमी दरात विकली जातील का, असाही प्रश्न आहे. अशाच प्रकारच्या अनेक प्रश्नांवर आरोग्य विभागाचे शासकीय अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ, डॉक्टर्स व औषध विक्रेते यांच्यात चर्चा घडवून आणणार आहे. सामाजिक वैद्यकीय परिषद लोकमतच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. त्यास नवी मुंबई केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन व नवी मुंबई डॉक्टर्स असोसिएशन यांचे देखील सहकार्य लाभले आहे. परिषदेला प्रमुख वक्ते म्हणून एम.सी.आय.एम. चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त गिरीश हुकरे, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश निकम, आय.एम. ए. चे राज्य सचिव डॉ. पार्थिव संघवी, न्यायवैद्यक तज्ज्ञ डॉ. विनायक म्हात्रे, ज्येष्ठ समाजसेविका डॉ. सुधा कंकारीया, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल गुप्ता, औषध क्षेत्रातील अभ्यासक डॉ. अमित डँग, नागरिक सहायता समिती समन्वयक सौरभ सिन्हा आदी उपस्थित राहणार आहेत. परिषद डॉक्टर्स, औषध विक्रेते तसेच इच्छुकांसाठी मोफत असून प्रवेशाकरिता पूर्वनोंदणी आवश्यक आहे.