फ्लॉवरच्या पाल्यातून सामाजिक संस्था मालामाल, पूर्वाश्रमीचे ठेकेदार आता बनले व्यवस्थापक
By नामदेव मोरे | Updated: January 16, 2025 13:03 IST2025-01-16T13:02:51+5:302025-01-16T13:03:02+5:30
मुंबईतील भाजीपाला मार्केट १९९६ मध्ये नवी मुंबईत स्थलांतर झाले.

फ्लॉवरच्या पाल्यातून सामाजिक संस्था मालामाल, पूर्वाश्रमीचे ठेकेदार आता बनले व्यवस्थापक
नवी मुंबई : बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमधील कोबी, फ्लॉवरचा कचरा उचलण्यासाठीचा संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू आहे. सामाजिक संस्थांच्या नावाखाली हा कचरा उचलण्यात येत आहे. दहा वर्षांत चार संस्थांनी कचरा उचलण्याचे काम करून आर्थिक कमाई केली आहे. संस्था बदलल्या असल्या तरी प्रत्यक्षात राबणारे व राबवून घेणारे हात मात्र वर्षांनुवर्ष तेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील भाजीपाला मार्केट १९९६ मध्ये नवी मुंबईत स्थलांतर झाले. मुंबईतून मार्केट स्थलांतर होत असताना तेथील गुन्हेगारीची मुळेही नवी मुंबईत स्थलांतरित झाली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेकांनी मार्केटमध्ये विविध प्रकारच्या कामांत हस्तक्षेप केले व त्या माध्यमातून अर्थार्जन करण्यास सुरुवात केली. मार्केटमध्ये रोज कोबी फ्लॉवरची ३०० ते ४०० टन आवक होती. त्यांचा पाला कचरा म्हणून टाकून दिला जातो. रोज १२ ते १५ टन पाला तयार होतो. कचऱ्यात टाकलेला हा पाला उचलून तबेलाचालकांना पुरविण्याचे काम तीन ते चार गट करतात. यामधील काहींचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचेही बोलले जाते. पूर्वी वैयक्तिक स्तरावर पाला उचलला जात होता.
पाला उचलण्याच्या संघर्षातूनच झाला गाेळीबार
सुरुवातीला अनेक वर्षे शिव चॅरिटेबल ट्रस्ट हे काम करीत होती. यानंतर कर्तव्य सामाजिक संस्था व जय शंभोनारायण संस्था काम करत असल्याची माहिती बाजार समितीमधील काही घटकांनी दिली. अखेर राजाराम टोके यांच्या शेतकरी भाजीपाला पुरवठा सहकारी संस्थेने शासनाकडे पाठपुरावा करून हे काम मिळविले. पाला उचलण्यासाठी या संस्था व त्यांचे चालक यांच्यामध्ये नेहमीच संघर्ष होत असून, यातूनच टाेकेंवर गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
पूर्वाश्रमीचे ठेकेदार आता बनले व्यवस्थापक
गोळीबारप्रकरणी अटक केलेला संतोष गवळी हा अनेक वर्षांपासून कोबी, फ्लॉवरचा कचरा उचलण्याचे काम करत होता.
परंतु, शासनाने हे काम राजाराम टोके यांच्या संस्थेला दिल्यानंतर तो टोके यांच्या संस्थेमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता.
तशा प्रकारचे ओळखपत्रही त्याच्याकडे होते. गवळीबरोबर इतर ठेकेदारांकडेही व्यवस्थापकाचे व काम करणाऱ्यांकडे कामगार म्हणून ओळखपत्रे आहेत.