दहीहंडी मंडळांची सामाजिक बांधिलकी, केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात, सीमेवरील हुतात्मांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 04:29 AM2018-09-03T04:29:22+5:302018-09-03T04:29:32+5:30
केरळात झालेल्या महाप्रलयामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेकडो जण मृत्युमुखी पावले आहेत. आजही या भागात पुनर्वसनाचे काम सुरू आहे. नवी मुंबईतील काही दहीहंडी उत्सव मंडळांनी या कार्यात हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे.
- अनंत पाटील
नवी मुंबई : केरळात झालेल्या महाप्रलयामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेकडो जण मृत्युमुखी पावले आहेत. आजही या भागात पुनर्वसनाचे काम सुरू आहे. नवी मुंबईतील काही दहीहंडी उत्सव मंडळांनी या कार्यात हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवावर अधिक खर्च न करता केरळ पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय काही मंडळांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर शत्रूशी लढताना हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. प्लॅस्टिक बंदीसाठी गोविंदा पथकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले जाणार आहे.
शिरवणे गावातील मंडळांकडून स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे.
ऐरोली सेक्टर १६ येथील श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयाच्या मैदानात सुनील चौगुले स्पोटर््स असोसिएशनच्या माध्यमातून मोठ्या बक्षिसाची दहीहंडी बांधली जाते. परंतु यावर्षी बक्षिसातील काही रकम केरळ पूरग्रस्तांसाठी देणार असल्याचे या दहीहंडीचे आयोजक तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी स्पष्ट
केले आहे.
ही आर्थिक मदत वाशीतील केरळ भवनमध्ये जमा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशाच्या सीमेवर धारातीर्थी पडून हुतात्मा झालेल्या जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. घणसोली गावात संस्कार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि आयोजक अंकुश पांडुरंग नाईक यांनी घणसोलीत स्वर्गीय बाळाजी आंबो पाटील महापालिका शाळेच्या मैदानात दहीहंडीचे आयोजन केले आहे. या माध्यमातून प्लॅस्टिक बंदीबाबत नागरिकांत जनजागृती केली जाणार असल्याचे अंकुश नाईक यांनी सांगितले.
वाशी सेक्टर १ येथे श्री गणेश बाल मित्र मंडळाच्या वतीने आयोजक शंकर ऊर्फ बाबा पुजारी यांनी एक लाखाचे पारितोषिक असलेली दहीहंडी जाहीर केली आहे. तसेच केरळ पूरग्रस्तांनाही आर्थिक मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिरवणे गावात विनोद-सारिका कला क्र ीडा मंडळाने महापालिका शाळेजवळ दहीहंडीचे आयोजन केले आहे.
स्वच्छतेचा संदेश देत ‘सुंदर नवी मुंबई आणि स्वच्छ नवी मुंबई’चा जागर करण्याचा मंडळाचा संकल्प असल्याची माहिती महापौर जयवंत सुतार यांनी दिली.
नवी मुंबईत ५० टक्के दहीहंड्या रद्द
पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर नवी मुंबईमधील अनेक प्रमुख मंडळांनी दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक मंडळांनी केरळ आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरखैरणेत डी मार्ट मॉलसमोर वनवैभव कला व क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षी लाख मोलाच्या पारितोषिकांची दहीहंडीची परंपरा गेल्या वर्षीपर्यंत सुरू होती.