नवी मुंबई : अहमदनगर येथून आलेल्या कुटुंबाला सोसायटीने प्रवेश नाकारल्याने अख्खे कुटुंब रस्त्यावर बसून आहे. जुईनगर सेक्टर २३ येथील कानोबा छाया सोसायटीत शुक्रवारी हा प्रकार घडला. त्यांच्याकडे वैद्यकीय दाखला व प्रवास पास असतानाही सोसायटीतील सदस्यांनी त्यांची अडवणूक केली.बाळासाहेब आंधळे पत्नी व दोन मुलांसह या ठिकाणी भाडेतत्त्वावर राहतात. अडीच महिन्यांपूर्वी अहमदनगर येथील गावी गेले होते; परंतु लॉकडाउन वाढतच चालल्याने व जमापुंजी संपल्याने शुक्रवारी ते नवी मुंबईत आले. त्यांनी वैद्यकीय दाखल्यासह पोलिसांचा प्रवास परवानादेखील मिळवला आहे. यानंतर त्यांना सोसायटीत प्रवेश नाकारला. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून हे कुटुंब सोसायटीच्या गेटवर बसून आहे.घरमालकानेही त्यांना सोसायटीत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न केला; परंतु सोसायटीने स्थलांतरित असल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारला. दरम्यान, त्यांनी या प्रकरणी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सोसायटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर दुपारी ४ च्या सुमारास कुटुंबासाठी सोसायटीचे फाटक उघडले; परंतु विनाकारण झालेल्या अडवणुकीमुळे कुटुंबीयांना मन:स्ताप सहन करावा लागल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.- लॉकडाउन लागल्यापासून मुंबईकडे व्यक्तींना गावाकडे प्रवेश नाकारण्याचे प्रकार घडत आहेत. अशातच गावाकडून मुंबईत आलेल्यांनाही सोसायटीत प्रवेश नाकारला जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.
सोसायटीने नाकारला प्रवेश, कुटुंब रस्त्यावर; मनस्ताप दिल्याप्रकरणी कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:50 AM