सोलनपाडा धरण ओव्हरफ्लो
By admin | Published: July 12, 2016 02:46 AM2016-07-12T02:46:23+5:302016-07-12T02:46:23+5:30
पावसाचा जोर कायम असल्याने कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरण ओव्हरफ्लो झाले. मागील आठवड्यात धरणात पाणी नव्हते,
नेरळ : पावसाचा जोर कायम असल्याने कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरण ओव्हरफ्लो झाले. मागील आठवड्यात धरणात पाणी नव्हते, त्यामुळे संतप्त पर्यटकांनी सोशल मीडियावर फिरत असलेल्या पोस्टबाबत आगडपखाड केली होती. मात्र गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे १० जुलै रोजी (रविवारी) सोलनपाडा धरण भरल्यानंतर त्याच्या सांडव्यामधून पाणी बाहेर पडू लागले. धरण ओव्हरफ्लो होतानाचा अनुभव हजारो वर्षा सहलप्रेमींनी घेतला.
जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे खात्याने बांधलेल्या जामरुख सोलनपाडा येथील पाझर तलावाची दुरुस्ती करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी या तलावाची दुरुस्ती केल्यानंतर सांडवा नव्याने बांधण्यात आला होता. धरण पूर्ण भरल्यानंतर अतिरिक्त पाणी सांडव्यामधून बाहेर पडते, त्या ठिकाणी भिजण्याचा आनंद घेण्यासाठी गेल्यावर्षी वर्षा सहलप्रेमी पावसाळ्यात आले होते. त्यावेळी एका पर्यटकाचा मृत्यू देखील झाला होता. मात्र याचा पर्यटकांवरकाहीही परिणाम न झाल्याचे येथील गर्दीवरून दिसून येत आहे. सोशल मीडियावर पावसाळा सुरू होताच गेल्यावर्षी भरून वाहणाऱ्या धरणाचे फोटो व्हायरल होत होते. त्यामुळे मागील रविवारपर्यंत गर्दीने येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला होता. कारण ३ जुलैपर्यंत धरणाच्या जलाशयात देखील पाणी साठलेले नव्हते. परंतु मागील चार दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने सोलनपाडा धरण रविवारी पूर्ण भरले. शनिवार ९ जुलै रोजी धरणाच्या जलाशयामध्ये जेमतेम पाणीसाठा असल्याने पर्यटक आणि स्थानिक प्रचंड नाराज झाले होते. स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देणाऱ्या या सोलनपाडा धरणाच्या भरण्याची वाट सर्व पाहात असताना १० जुलै रोजी धरण भरले. त्यावेळी हजारोंच्या संख्येने पर्यटक आले असल्याने सांडवा पहिल्यांदा कसा वाहतो याचा वेगळा अनुभव पर्यटकांनी घेतला.
रविवारी दुपारनंतर ही माहिती सर्व ठिकाणी पोचली असता पर्यटकांची गर्दी वाढली. परिणाम सोलनपाड्याकडे जाणारे रस्ते वाहतूककोंडीत सापडले. आंबिवलीपासून सोलनपाडा गावापर्यंत म्हणजे ८ किलोमीटर परिसरात वाहतूककोंडी दुपारपासून झाली होती. स्थानिक सोलनपाडा ग्रामस्थ आणि टेंबरे ग्रामपंचायतीने वाहतूककोंडी होणार नाही याची काळजी घेतली होती. यावेळी चोख पोलीस बंदोबस्तही होता. (वार्ताहर)