- वैभव गायकर
पनवेल: रविवारी सर्वत्र कंकणाकृती सूर्यग्रहण अनेकांनी पाहिले. खारघर शहरातील हौशी खगोल निरीक्षक शैलेश क्षीरसागर यांनी आपल्या राहत्या घरातून सुमारे 5 फूट उंचीच्या व 12 इंच व्यासाच्या खगोलशास्त्रीय दुर्बिणीतून हे सूर्यग्रहण पाहिले. मुंबई मधील सर्वात मोठ्या दुर्बिणींपैकी ही एक दुर्बीण आहे.
रविवारी ग्रहणाच्या सुरुवातील ऊन पावसाचा खेळ सुरु असल्याने अनेकांना ग्रहण पहावयास मिळते की नाही ?अशी चिंता लागून राहिली असताना 12 वाजेपर्यंत सर्वत्र लख्ख प्रकाश पडल्याने अनेकांना हे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहता आले. हौशी खगोल निरीक्षक शैलेश क्षीरसागर यांनी पावसाची शक्यता असल्याने घरूनच या ग्रहणाचा आनंद घेतला. घरातच ही दुर्बीण सेट करून त्यांनी हे कंकणाकृती ग्रहण पाहिले.
या दुर्बिणीची खासियत म्हणजे १२ इंच व्यासातून चंद्रावरील सुमारे ८ ते १० किलोमीटर्सचा परिसर निरखून पाहता येतो. अब्जावधी प्रकाशवर्षे दूरच्या आकाशगंगा आणि लाखो प्रकाशवर्षे दूर असलेले तारकापुंज, गुरुचे ४ चंद्र आणि शनीची कडी, सर्व ग्रह, शुक्र ग्रहाच्या चंद्रासारख्या कला पाहता येतात. तसेच दुर्बिणीला मोबाईल आणि डीएसएलआर जोडून छायाचित्रण करता येत असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
अशाप्रकारे ग्रहण अथवा आकाशगंगे मधील घडामोडी पाहायच्या असल्यास हौशी खगोल निरीक्षक शैलेश क्षीरसागर हे राहत्या सोसायटी मधील सर्व रहिवाशांना निमंत्रित करीत असतात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने त्यांनी घरूनच आपल्या कुटुंबीयांसमवेत हे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिले.