- योगेश पिंगळेनवी मुंबई - शहरातील नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देताना महिलांचे संरक्षणदेखील महत्त्वाचे असून आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने सोलर हायमास्टकरिता २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचे वाशी सेक्टर १० येथील महापालिका रुग्णालय आणि श्री दत्तगुरुनगर सोसायटी येथे भूमिपूजन करण्यात आले. रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना प्रकाश नसल्याने पोलिसांना फुटेज शोधण्यास नाहक त्रास होतो. परंतु आता प्रत्येक विभागामध्ये पाच सोलर हायमास्ट लावण्यात येणार असल्याने चेन स्नॅचिंग, महिलेची छेडछाड या अशा विविध गुन्ह्यांवर आळा बसणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शहरात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी तसेच महिलांच्या संरक्षणाकरिता सोलर हायमास्ट व सौर पथदिवे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रथमच बसविण्यात येत आहेत. बेलापूर मतदार संघातील जनतेला अक्षय ऊर्जेचा वापर करून नागरिकांना लख्ख प्रकाश मिळणार आहे. यावेळी आमदार म्हात्रे यांनी सांगितले की, दत्तगुरू सोसायटीमध्ये सर्वसामान्य नागरिक राहतात आणि त्यांच्या महिलांच्या सुरक्षेकरिता सोलर हायमास्ट बसविण्यात येत आहेत. यामुळे रात्रपाळीस कामासाठी घराबाहेर पडणारे नागरिक विशेषत: महिलांना मोठा दिलासा मिळेल. यावेळी विकास सोरटे, मुकुंद विश्वासराव, वसारामजी राजपूत, प्रताप बोसकर, रामकृष्ण अय्यर, गणेश शिंदे, महेश दरेकर, प्रवीण भगत, राजेश आहिरे, मधुकर शिंदे, विक्रम सुतार, रत्ना विश्वासराव, प्रमिला खडसे, मालती सोनी, मीना कुटे, रिना राय आदी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.