आदिवासींचा पाण्यासह घरांचा प्रश्न सोडविणार; मंदा म्हात्रेंचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 11:24 PM2019-11-01T23:24:19+5:302019-11-01T23:24:32+5:30
नेरुळजवळ आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी
नवी मुंबई : नेरुळमध्ये उरण फाट्यापासून जवळील डोंगरावर आदिवासी पाडे सुविधांपासून वंचित आहेत. या नागरिकांना पक्की घरे मिळवून देऊन त्यांचा पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन आमदार मंदा म्हात्रे यांनी दिले आहे.
ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीच्या शेवटच्या टोकाजवळ आदिवासी वसाहत आहे. एमआयडीसी व नवी मुंबईची रचना होण्यापूर्वीपासून या ठिकाणी वसाहत आहे; परंतु अद्याप येथील नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. आमदार मंदा म्हात्रे यांनी येथील नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली. रहिवाशांना दिवाळी फराळ व मिठाई दिली. वसाहतीपर्यंत जाण्यासाठी या पूर्वी रोडचे काम करण्यात आले. पायवाटाही चांगल्या करण्यात आल्या आहेत. रहिवाशांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. येथील रहिवाशांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना महापालिका प्रशासनास दिल्या आहेत. आदिवासींना पक्की घरे मिळावी, यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली. पक्की घरे मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आदिवासी वसाहतीमधील मुन्ना नाईक यांनी सांगितले की, आमदार मंदा म्हात्रे यांनी यापूर्वी रेशन कार्ड, आधार कार्ड, बँकेचे खाते व इतर समस्या सोडविल्या आहेत. वसाहतीमध्ये येऊन दिवाळी साजरी केल्याचा आनंद होत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.