नवी मुंबई : आरटीओ कार्यालयाला दलालांच्या विळख्यातून मुक्त करून, रिक्षाचालकांची पिळवणूक थांबवण्याच्या मागणीसह प्रलंबित मागण्यांसाठी रिक्षाचालकांच्या वतीने शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला. नवी मुंबई रिक्षा टॅक्सी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने त्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आरटीओ अधिका-यांना मागण्यांचे निवेदन देत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.रिक्षाचे परमिट सर्वांसाठी खुले केल्याने शहरातील रिक्षांच्या संख्येत वाढत आहे. अशातच बोगस रिक्षांचेही प्रमाण अधिक असल्याने गरजू रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. यामुळे प्रामाणिक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्याकरिता बोगस रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी रिक्षा संघटनांची आहे. त्याशिवाय ओला-उबेरबाबत आरटीओने ठोस भूमिका घेण्याचीही त्यांची मागणी आहे. अशा अनेक मागण्यांकडे आरटीओ दुर्लक्ष करत असून, रिक्षाचालकांचीच पिळवणूक करत असल्याचा संघटनांचा आरोप आहे. एखाद्या कामासाठी आरटीओ कार्यालयात गेलेल्या रिक्षाचालकाची चिरीमीरीसाठी अडवणूक केली जाते. मात्र, तेच काम दलालामार्फत गेल्यास बिनाचौकशीचे केले जाते. अशा प्रवृत्तीच्या अधिकाºयांवर कारवाईच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.समितीचे संस्थापक मारुती कोंडे, अध्यक्ष भरत नाईक, सरचिटणीस सुनील बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली एपीएमसी येथील आरटीओ कार्यालयावर हा मोर्चा निघाला. त्यामध्ये दोनशेहून अधिक रिक्षा चालकांनी सहभाग घेतला होता. या वेळी स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, दशरथ भगत यांनीही मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला.बैठकीतही तोडगा नाहीमोर्चाच्या शेवटी आंदोलकांचे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी गेले असता, आरटीओ अधिकारी संजय डोळे कार्यालयात उपस्थित नव्हते. यामुळे त्यांनी सहायक अधिकाºयांना मागणीचे निवेदन दिले; परंतु चर्चेसाठी वरिष्ठ अधिकारी नसल्याने त्यांनी केवळ निवेदन स्वीकारण्याचे काम केले. यामुळे रिक्षाचालकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मोर्चा काढूनही त्यावर चर्चा होऊ न शकल्याची नाराजी मारुती कोंडे यांनी व्यक्त केली.शिवसेनेने फिरवली पाठरिक्षाचालकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने कृती समितीमार्फत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये शिवसेना पुरस्कृत संघटना वगळता इतर सर्व संघटनांनी सहभाग घेतला होता. परिवहनमंत्री शिवसेनेचे असल्याने त्यांनी याच मुद्द्यांवरून स्वतंत्र मोर्चा काढून, श्रेय लाटण्याच्या हालचाली चालवल्याची चर्चा रिक्षाचालकांमध्ये आहे.
दलालांच्या विळख्यातून आरटीओला सोडवा; रिक्षाचालकांचा धडक मोर्चा, अडवणूक होत असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 3:15 AM