- नारायण जाधवनवी मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेले मराठ्यांचे भगवे वादळ पुण्याची वेस ओलांडून राजधानी मुंबईकडे कूच करतेय. मराठा आरक्षण मोर्चात लाखाे मराठा बांधवांसह लेकुरवाळ्या माता-भगिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वयोवृद्धांनी आरक्षणासाठी वयोमानाचा थकवा विसरून मुंबईकडे धाव घेतली आहे. या सर्वांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये, मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे.
खोपोली, पनवेल, कळंबोली, खारघर, नेरूळ, एपीएमसी मार्केट या भागात मराठा बांधवांनी आंदोलकांच्या जेवणाची जय्यत तयारी सुरू केली होती. यासाठी सकाळपासून मोर्चाच्या मार्गातील अनेक ठिकाणी जेवण तयार करण्यासाठी मराठा पुरुष बांधवांमध्ये कोणी लसूण सोलताना दिसतोय, कुणी कोथिंबीर, भाज्या निवडतोय, तर कोणी कांदा चिरताना दिसत हाेते.
प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर, ‘आण रं ती कांद्याची गोणी. त्या सुऱ्यापण घे, या भावड्यांना दे कांदा चिरायला. आरक्षणाच्या मागणीसाठी आपला वाघ येतोय मुंबईला, असे सांगून ते पुन्हा लसूण सोलू लागले, कांदा चिरू लागले.’
आता ही आरपारची लढाई आहे...
कांदा चिरण्याची सवय नसल्याने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले होते. यावर त्यांचे म्हणणे होते, होय येथे पाहा कुणी लसूण सोलताेय तर कोणी डाळ-तांदूळ साफ करतोय. माझ्यासारख्या इतरांच्या डोळ्यांत कांदा चिरल्याने पाणी आलंय, हे खरं आहे; पण आमची लढाई हक्कांसाठी सुरू आहे. नव्या पिढीला आरक्षणाचे लाभ मिळावेत, यासाठी ती सुरू आहे. आता ही आरपारची लढाई आहे. यामुळे आता डोळ्यांत पाणी आलं तरी चालेल. कारण आरक्षण मिळाल्यास तेच आनंदाश्रू ठरतील.