नवी मुंबई : शहरात एकाच दिवशी सोनसाखळीचोरीचे चार गुन्हे घडले आहेत. वाढत्या सोनसाखळीचोरीच्या गुन्ह्यांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तर गुन्हेगार पुन्हा डोके वर काढू लागल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.मागील काही दिवसांपासून काही प्रमाणात नियंत्रणात आलेल्या सोनसाखळीचोरीच्या घटना पुन्हा घडू लागल्या आहेत. शुक्रवारी एकाच दिवशी शहरात चार ठिकाणी सोनसाखळीचोरी झाली आहे. त्यापैकी नेरुळ हद्दीत एकाच वेळी दोन महिलांचे मंगळसूत्र चोरून चोरट्यांनी पळ काढला आहे, यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. जया कोणार व अतिका सलाम अशी दोन महिलांची नावे आहेत. दोघीही रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रस्त्यालगत भाजी खरेदी करत होत्या. या वेळी पाठीमागून आलेल्या अज्ञाताने दोघींच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढला. यामध्ये त्यांचे एकूण ५७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची नोंद नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याचदरम्यान रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र खेचून चोरट्याने पळ काढला आहे. तर गुरुवारी ऐरोली सेक्टर ९ येथील रस्त्याने पायी चाललेल्या संगीता मारी यांचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे. त्या रस्त्याने चालत जात असताना पाठीमागून चालत आलेल्या व्यक्तीने मंगळसूत्र खेचून काही अंतरावर मोटारसायकलवर उभ्या असलेल्या साथीदारासह पळ काढला. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर सीबीडी येथे उषा अहिरे (५९) या वृद्धेचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे. शुक्रवारी रात्री ११. ३० वाजण्याच्या सुमारास त्या पतीसह रस्त्याने चालल्या होत्या. या वेळी पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांचे मंगळसूत्र खेचून पळ काढला.सोनसाखळीचोरीच्या घटनांमध्ये अनेकदा महिला जखमीही होतात. शिवाय महिलांच्या भावनांशी संबंधित दागिना चोरीला जात असल्याने अशा गुन्ह्यांकडे पोलिसांनीही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. मात्र, मागील काही महिन्यांत सातत्याने सोनसाखळीचोरीचे गुन्हे घडू लागले आहेत. यामध्ये शहराबाहेरील सराईत टोळीचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण करण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचा संताप महिलावर्गाकडून व्यक्त होत आहे.
सोनसाखळी चोरट्यांचा धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:34 AM