रबाळेतून हरवलेला मुलगा सापडला
By admin | Published: December 6, 2015 12:51 AM2015-12-06T00:51:35+5:302015-12-06T00:51:35+5:30
फिरण्यासाठी घराबाहेर गेल्यानंतर हरवलेल्या १२ वर्षीय मुलाचा सात महिन्यांनी शोध लागला आहे. चुकीने केरळला गेल्यानंतर तिथल्या पोलिसांनी मुंबईच्या बालसुधारगृहात त्याला
नवी मुंबई : फिरण्यासाठी घराबाहेर गेल्यानंतर हरवलेल्या १२ वर्षीय मुलाचा सात महिन्यांनी शोध लागला आहे. चुकीने केरळला गेल्यानंतर तिथल्या पोलिसांनी मुंबईच्या बालसुधारगृहात त्याला पाठवले होते. यादरम्यान हरवलेल्या मुलांचा शोध सुरू असताना गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने त्याचा शोध घेतला.
अक्षय धुरवे (१२) असे पोलिसांनी शोधलेल्या मुलाचे नाव आहे. रबाळे एमआयडीसी येथे राहणारा अक्षय अल्पशिक्षित असून त्याला फिरायची आवड आहे. यामुळे सात महिन्यांपूर्वी तो फिरण्यासाठी घरातून बाहेर निघाला होता. एक्सप्रेस पकडून तो थेट केरळला पोचला. तेथे केरळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तिथल्या बालसुधारगृहात जमा केले होते. तेथून त्याला भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवले होते. पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय क्षीरसागर यांचे पथक भिवंडीच्या बालसुधारगृहात गेले असता, त्यांना अक्षयविषयी माहिती मिळाली. पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेऊन कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे. (प्रतिनिधी)