सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : बडोदा बँक लूट प्रकरणात अटकेत असलेल्या गुन्हेगारांनी आपसातही एकमेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. बँक लुटल्यानंतर मालेगाव येथे चोरीचे सोने विकण्यासाठी टोळीचे चौघे गेले होते. या वेळी तिथल्या सोनाराने काही दागिने बनावट असल्याचे सांगून ते हडपले होते.जुईनगर येथील बडोदा बँक लूट प्रकरणी पोलिसांनी अद्यापपर्यंत सुमारे दहा जणांना अटक केली आहे. त्यापैकी श्रावण हेगडे, मोईद्दीन शेख, हाजीद मिर्झा बेग व किशन मिश्रा हे प्रमुख सूत्रधार आहेत. त्यांनी हरियाणा येथे भुयार खोदून झारखंडच्या टोळीने बँक लुटल्याच्या घटनेच्या आधारावर कट रचला होता. त्यानुसार प्रत्येकावर वेगवेगळी जबाबदारी सोपवून नियोजनबद्धरीत्या बडोदा बँकेच्या खालून भुयार खोदून ३० लॉकर फोडले होते. त्यामधील सुमारे तीन कोटी रुपये किमतीचा ऐवज त्यांनी लुटला होता. त्यांनी बँकेतील सुमारे ७० लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यापैकी अवघे ३० लॉकर उघडता आल्याने त्यांनी हाती लागलेला मुद्देमाल चोरून पोबारा केला होता. त्यांनी लुटलेल्या ऐवजामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेचा समावेश होता. मात्र बँकेतून नेमका किती ऐवज चोरीला गेला याचा उलगडा होऊ शकलेला नाही. त्यांनी सोन्याचे दागिने मालेगाव येथील संजय वाघ या सोनाराला विकले होते. त्याकरिता हेगडे, शेख, हाजीद व मिश्रा हे चौघेही दोन दिवस मालेगावात होते. यादरम्यान चोरीचे सोने विक्रीचा व्यवहार होत असताना, वाघ याने त्यांनाही गंडा घातला. वाघ याने दागिन्याची पाहणी करताना, काही दागिने खरे असतानाही ते बनावट असल्याचे सांगितले. शिवाय उर्वरित दागिन्यांची जी रक्कम ठरली, त्यातही त्याने मोठा हात मारला होता. मात्र, व्यवहार उरकून गेल्यानंतर पैसे मोजताना शेख व त्याच्या साथीदारांच्या निदर्शनास ही बाब आली. याचदरम्यान तांत्रिक तपासाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मालेगाव येथून वाघला ताब्यात घेतल्याने संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. तसेच त्याच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे बँक लुटणाºया मुख्य सूत्रधारांसह इतर सर्वांना मुंबई, उत्तरप्रदेश तसेच कोलकाता येथून अटक करण्यात आली. याप्रकरणी नुकतेच हाजीद मिर्झा बेग याच्या बहिणीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. त्याने गुन्ह्याचा सर्व ऐवज तिच्याकडे लपवला होता, असे समजते. त्यानुसार या गुन्ह्यातील सुमारे पाच किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केल्याचे समजते.
‘तो’ सोनार निघाला चोरावर मोर, दागिने बनावट असल्याचे सांगून हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:58 AM