सोनसाखळी चोराला रंगेहाथ अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 03:22 AM2018-10-02T03:22:34+5:302018-10-02T03:22:49+5:30
उलवे येथील गणेशपुरी परिसरात राहणाºया अर्चना कोळी या महिलेसोबत हा प्रकार घडला. त्या उरण फाटालगतच्या परिसरात घरकामानिमित्ताने दररोज ये-जा करतात.
नवी मुंबई : बस थांब्यावर उभ्या महिलेची सोनसाखळी खेचून पळ काढणाऱ्या चोरट्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. शनिवारी दुपारी उरण फाटा येथे घडलेल्या या प्रकरणात अटक आरोपीकडून दोन गुन्हे उघड झाले आहेत. महिलेने आरडाओरडा केल्याने तिच्या मदतीला नागरिक धावून आल्याने तो पोलिसांच्या हाती लागला.
उलवे येथील गणेशपुरी परिसरात राहणाºया अर्चना कोळी या महिलेसोबत हा प्रकार घडला. त्या उरण फाटालगतच्या परिसरात घरकामानिमित्ताने दररोज ये-जा करतात. शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे त्या उलवेला जाण्यासाठी उरण फाटा येथील बसथांब्यावर उभ्या होत्या. यावेळी काही अंतरावर दुचाकी उभी करून त्याठिकाणी एक तरुण चालत आला. त्याने संधी साधून त्यांच्या गळ्यातले दागिने खेचून पळ काढला. यावेळी महिलेने त्याला प्रतिकार करत आरडाओरडा केला. त्यामुळे चोरट्याने मोटारसायकलवरून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला असता ऐन वेळी त्याची मोटारसायकल सुरू झाली नाही. यामुळे तो पायी पळून जात असताना रस्त्याने जाणाºया एका कार चालकाने कार आडवी घालून त्याला अडवले. त्यांच्या मदतीला इतरही प्रवाशांनी धाव घेतल्याने सदर चोरटा हाती लागला. आल्वीन सुभाष डाव (३२) असे त्याचे नाव आहे. जमावाने त्याला चोप देवून सीबीडी पोलिसांच्या ताब्यात दिले. तो टिळकनगरचा राहणारा असून चौकशीत त्याने दोन गुन्ह्याची कबुली दिल्याचे सहायक निरीक्षक चंद्रहार गोडसे यांनी सांगितले. यानुसार त्याच्यावर सीबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून उपनिरीक्षक विक्रम साळुंखे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.