सोनू झा प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल
By admin | Published: November 18, 2016 02:19 AM2016-11-18T02:19:24+5:302016-11-18T02:19:24+5:30
सोनू झाचा बुधवारी मृत्यु झाल्यानंतर रात्री विरार पोलिसांनी मारहाण प्रकरणातील नऊ आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
विरार : सोनू झाचा बुधवारी मृत्यु झाल्यानंतर रात्री विरार पोलिसांनी मारहाण प्रकरणातील नऊ आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तीन आरोपी याआधीच जामिनावर सुटले आहेत. तर पाच जण न्यायालयीन कोठडीत असून एक जण फरार आहे.
विरार पूर्वेकडील सहकार नगरात दिवाळीत फटाके फोडण्यावरून दोन गटात हाणामारी झाली होती. त्यात सोनू झा हा गंभीर जखमी होऊन कोमात गेला होता. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून रतन झा, साजन शर्मा, शशिकांत पटवा, असलम शेख, रोशन पाठक, महेश राजभर, शराफत शेख आणि समय चौहाण यांना अटक केली होती. तर आशिष नावाचा आरोपी फरार आहे. यातील रतन, साजन आणि शशिकांत यांची जामिनावर सुटका झालेली आहे. तर असलम, रोशन, महेश, शराफत, समय सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
बुधवारी संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असतांना सोनूचा मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या जमावाने बुधवारी रात्री पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला होता. यावेळी बेकाबू झालेल्या जमावाने पोलिसांना धक्काबुक्की केली होती. तसेच वसई विरार पालिकेच्या परिवहन बस आणि दोन रिक्षांची तोडफोड केली होती. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा यासाठी पोलीस ठाण्यात तब्बल तीन तास हंगामा सुरु होता. यावेळी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. रात्री उशिरा सर्व आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. (वार्ताहर)