नवी मुंबई : स्वच्छता सर्वेक्षण संपताच शहरातील पदपथांवर पुन्हा अनधिकृत बाजार बसू लागले आहेत, त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असतानाही पालिकेकडून कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी, केवळ सर्वेक्षणापुरती शहरात स्वच्छता राखली जात असल्याचाही संशय व्यक्त होऊ लागला आहे.
नवी मुंबईला स्वच्छतेत देशात अव्वल स्थान प्राप्त करून देण्यासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता सार्वजनिक स्थळांची स्वच्छता केली जात असून, रस्त्यालगतच्या भिंतीही रंगवण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच पदपथही फेरीवाल्यांच्या विळख्यातून सोडवण्यात आले होते.
मात्र, हा खटाटोप केवळ स्वच्छता सर्वेक्षणासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे, त्यामुळेच सर्वेक्षण संपताच पुन्हा पदपथांवर बाजार बसू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. यावरून प्रशासनालाच शहर स्वच्छतेबाबत गांभीर्य नसून, केवळ स्पर्धेसाठी दिखावा होत असल्याचा संशय बळावू लागला आहे. तर फेरीवाल्यांकडून पदपथ बळकावले जात असल्याचा मनस्ताप पादचाºयांना करावा लागत आहे.
पदपथांवर झालेल्या अतिक्रमणामुळे पादचाºयांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामध्ये त्यांच्या जीविताला अपघाताचा धोका सतावत आहे.असे दृश्य वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, नेरुळ परिसरात पाहायला मिळत आहे. या फेरीवाल्यांवर ठोस कारवाईसाठी विभाग कार्यालयामार्फत तीव्र मोहीम राबवली जाण्याची गरज सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे; परंतु प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी यांच्याच अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे फेरीवाले सोकावले असल्याचा आरोप होत आहे.
पदपथ, मोकळी जागा या ठिकाणी बसणारे हे अनधिकृत फेरीवाले शहराबाहेरून येत असल्याचेही उघडपणे दिसून येत आहे. त्यांच्यामुळे शहराच्या स्वच्छतेचाही बोजवारा उडत आहे. यानंतरही त्यांना कायमचे हटवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाणारी नवी मुंबई भविष्यात फेरीवाल्यांचे शहर म्हणून ओळखली जाण्याची भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.