सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील शिल्लक घरांची लवकरच विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:40 AM2018-07-28T00:40:23+5:302018-07-28T00:40:49+5:30
सिडकोची कार्यवाही; अडीच हजार मालमत्तांचा समावेश
नवी मुंबई : विविध कारणांमुळे नव्या आणि जुन्या गृहनिर्माण योजनेत विक्रीविना पडून असलेल्या सदनिका आणि व्यावसायिक गाळ्यांची सध्याच्या दराने विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी लवकरच अर्ज विक्री केली जाणार आहे. त्यादृष्टीने सिडकोच्या संबंधित विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.
नवी मुंबई शहराची निर्मिती करताना सिडकोने विविध नोड्समध्ये जवळपास १,३५,000 मालमत्ता विकसित केल्या आहेत. यात निवासी आणि वाणिज्यिक मालमत्तांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात विविध उत्पन्न गटातील घटकांसाठी गृहयोजना राबविण्यात आली. काही भागात निवासी संकुले उभारली आहेत. अशा विविध प्रकल्पातील जवळपास अडीच हजार मालमत्ता अद्याप विक्रीविना पडून असल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाल्याचा दावा सिडकोने केला आहे. महत्त्वाचे म्हणजे सिडकोच्या अनेक घरांचा मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
काही इस्टेट एजंट्सनी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सिडकोच्या शिल्लक मालमत्तांवर डल्ला मारल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी समोर आली आहेत. त्यामुळे सध्या शिल्लक असलेल्या मालमत्तांचा अपहार होऊ नये, यादृष्टीने सिडकोने हे पाऊल उचलले आहे. शिवाय विविध कारणांमुळे विवादात सापडलेल्या मालमत्तांची जैसे थे स्थितीत विक्री करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घेतला आहे. त्यादृष्टीने त्यांनी संबंधित विभागाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या मालमत्तांच्या विक्रीतून सिडकोला जवळपास दीड ते दोन हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे.