शिल्लक घरांची लवकरच विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:25 AM2018-06-13T04:25:44+5:302018-06-13T04:25:44+5:30
शहराची निर्मिती करताना सिडकोने विविध विभागांत दीड लाखांपेक्षा अधिक घरांची निर्मिती केली आहे. यातील शेकडो घरे अद्यापि विक्रीविना पडून आहेत,
नवी मुंबई : शहराची निर्मिती करताना सिडकोने विविध विभागांत दीड लाखांपेक्षा अधिक घरांची निर्मिती केली आहे. यातील शेकडो घरे अद्यापि विक्रीविना पडून आहेत, अशा घरांचा सिडकोने अलीकडेच सर्व्हे केला आहे. आता या घरांची विक्री करण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून चाचपणी सुरू असल्याचे समजते.
मागील ४० वर्षांत सिडकोने नवी मुंबईसह पनवेल व उरण तालुक्यात १२ नोड विकसित केले आहेत. हे नोड विकसित करताना विविध आर्थिक घटकांसाठी दीड लाखांपेक्षा अधिक सदनिका बांधल्या आहेत. या सदनिकांची विक्री त्या-त्या वेळच्या धोरणानुसार करण्यात आली; परंतु आजही अनेक सदनिका विक्रीविना पडून आहेत. तर काही सदनिकांची परस्पर विक्री केल्याचे आढळून आले आहे. काही महिन्यांपूर्वी यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सिडकोने बांधलेल्या सर्व सदनिकांचा डेटा गोळा करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहराच्या विविध भागांत ८००पेक्षा अधिक मालमत्ता विक्रीविना पडून असल्याचे दिसून आले आहे. यात निवासी आणि वाणिज्य मालमत्तांचा समावेश आहे.