वाशी खाडीवर लवकरच तिसरा पूल, मंजुरीनंतर प्राथमिक कार्यवाही सुरू, वाहतूककोंडीला बसणार आळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 01:15 AM2017-11-19T01:15:49+5:302017-11-19T01:15:56+5:30
सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पुलावर तिसरा पूल बांधला जाणार आहे. सायन-पनवेल महामार्गावरील वाढती रहदारी, पुलावर येणारा वाहनांचा भार आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पुलावर तिसरा पूल बांधला जाणार आहे. सायन-पनवेल महामार्गावरील वाढती रहदारी, पुलावर येणारा वाहनांचा भार आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा पूल बांधला जाणार आहे. सध्या प्राथमिक स्तरावर या संदर्भात कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्राने दिली.
वाशी खाडी येथे मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा आणखी एक पूल उभारण्यात यावा, अशी मागणी गेल्या दहा वर्षांपासून आहे. आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची उभारणी करावी, अशा स्वरूपाची चर्चाही सुरू होती. आॅक्टोबर २0१५मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पुलाच्या बांधणीबाबत चर्चाही झाली होती, परंतु मागील दोन वर्षांत कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. मात्र, गेल्या वर्षी पुन्हा कार्यवाही सुरू करण्यात आली होती. या पुलाच्या बांधकामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी रस्ते विकास महामंडळावर सोपविण्यात आली होती. अहवालाच्या आधारे १३ जून २0१७ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथे तिसºया पुलाच्या उभारणीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या पुलाची निर्मिती करावी, यासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार, मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने या पुलाच्या निर्मितीस मंजुरी दिल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदा म्हात्रे यांना कळविले आहे.
मुंबई व नवी मुंबईला जोडणाºया सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. दोन्ही बाजूने महामार्ग रुंदावला असला, तरी सध्या वापर असलेल्या वाशी खाडीवरील पुलाची रुंदी वाढलेली नाही. या पार्श्वभूमीवर तिसरा खाडी पूल उपयुक्त ठरणार आहे.
महामार्गावर वाहनांचा अतिरिक्त ताण
बांधकाम विभागाने त्या वेळी केलेल्या सर्वेक्षणात या पुलावरून दररोज सरासरी १२,५00 एवढ्या संख्येने वाहनांची ये-जा असेल, असे गृहीत धरले होते, परंतु मागील काही वर्षांत या पुलावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. या पुलावरून सध्या दररोज सरासरी दोन ते अडीच लाख वाहने ये-जा करतात. त्यामुळे वाहनांचा ताण पडत असल्याने, महामार्गावर वाहतूककोंडी होत आहे.
वाशी खाडीवर १९७0 ते ७५ या कालावधीत पहिला पूल उभारण्यात आला होता, पण अतिवापरामुळे हा खाडी पूल कमकुवत झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर, सार्वजनिक बांधकाम विभागाने १९९0 ते ९५दरम्यान त्यालगतच दुसºया खाडीपुलाची उभारणी केली होती.