ध्वनिप्रदूषण धोकादायक पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 02:23 AM2017-08-15T02:23:24+5:302017-08-15T02:23:28+5:30

महानगरपालिका क्षेत्रात गतवर्षीपेक्षाही ध्वनिप्रदूषण वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे

Sound effects dangerous | ध्वनिप्रदूषण धोकादायक पातळीवर

ध्वनिप्रदूषण धोकादायक पातळीवर

Next

नामदेव मोरे ।
नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात गतवर्षीपेक्षाही ध्वनिप्रदूषण वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवासी क्षेत्रामध्ये ५५ डेसिबल एवढा निकष असताना ऐरोली व घणसोलीमध्ये ते ७३ डेसिबलपर्यंत गेले आहे. शांतता क्षेत्रामध्येही दिवस-रात्र गोंगाटाची स्थिती असल्याचे यावर्षीच्या पर्यावरण स्थिती अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले असून शहरवासीयांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची स्थिती व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या २०१६-१७ वर्षाचा वार्षिक पर्यावरण स्थिती अहवाल १८ आॅगस्टला होणाºया सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. या अहवालामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. शहरातील ध्वनिप्रदूषणाच्या वास्तवाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. निवासी, औद्योगिक रहदारी व शांतता क्षेत्रामध्येही ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. निवासी क्षेत्रामध्ये ५५ डेसिबल हा निकष निश्चित करण्यात आला आहे. परंतु एकाही विभागामध्ये या मर्यादेचे पालन होत नाही. घणसोली विभाग कार्यालय व ऐरोली से. १८ व १९ या जलकुंभ येथे सरासरी ७३ डेसिबलची नोंद झाली आहे. त्यानंतर वाशी हॉस्पिटल से. १० जवळ ६९ डेसिबलची नोंद झाली आहे.
वाशी हॉस्पिटलजवळ २०१५-१६ वर्षामध्ये ५८ डेसिबलची नोंद झाली होती. २०१६-१७ या वर्षामध्ये ६ टक्केने वाढ होवून ते प्रमाण ६९ डेसिबल झाले आहे. रहदारी असणाºया क्षेत्रामध्ये आवाजाची पातळी वाढली आहे. दिघा विभाग कार्यालय परिसरामध्ये ७० डेसिबल, रबाळे पंप हाऊस व बेलापूर अग्निशमन केंद्राजवळ ६९ डेसिबलची नोंद झाली आहे.
महानगरपालिका व वाहतूक विभागाने शहरातील शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, धार्मिक स्थळे, वृद्धाश्रम असणारी ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. परंतु प्रत्यक्षात एकाही ठिकाणी शांतता दिसत नाही. प्रचंड गोंगाटामुळे विद्यार्थी, रुग्ण व इतर घटकांना त्रास होवू लागला आहे. शांतता क्षेत्रामध्ये ५० डेसिबलचा निकष आहे. पण प्रत्यक्षात कोपरखैरणे रा. फ. नाईक परिसरामध्ये ६५ डेसिबल, माथाडी हॉस्पिटल से. ५ परिसरामध्ये ६४ डेसिबलची नोंद झाली आहे. सीबीडी से. ४ मधील ज्ञानपुष्प विद्यामंदिर येथे सर्वात कमी ५५ डेसिबलची नोंद झाली असली तरी मूळ निकषांपेक्षा जास्त आहे.
ध्वनिप्रदूषण कमी करण्याचे आव्हान पालिका व वाहतूक विभागासमोर उभे राहिले आहे. आवाजाची पातळी अशीच राहिली तर भविष्यात रक्तदाब, बहिरेपणा, चिडचिड होणे व इतर आजार वाढण्याची शक्यता आहे. वृद्ध, विद्यार्थी, रुग्ण यांच्या त्रासामध्येही भर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
>वाहनांमुळे वाढले प्रदूषण
शहरामधील वाहनांची वाढती संख्याही ध्वनिप्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. २००९-१० या वर्षामध्ये २ लाख ३ हजार वाहने होती. २०१६-१७ मध्ये ही संख्या ४ लाख २५ हजार एवढी झाली आहे. एपीएमसी, एमआयडीसी, सायन-पनवेल, ठाणे-बेलापूर रोड परिसरात २४ तास हजारो वाहनांची वर्दळ असते. वाहनांच्या आवाजामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्याच्यावर नियंत्रण मिळविणे अशक्य होत आहे.
नो हॉर्न मोहीम
ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी शहरामध्ये नो हॉर्न मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्याची गरज आहे. निवासी क्षेत्रातही विनाकारण वाहनधारक विशेषत: मोटारसायकल चालविणारे तरुण हॉर्न वाजवत असतात. हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. शहरवासीयांच्या आरोग्य रक्षणासाठी नो हॉर्न मोहीम राबविण्यासाठी वाहतूक पोलीस, महानगरपालिका व सामाजिक संघटनांनी राबविण्याची गरज आहे.
आरोग्यावर परिणाम
ध्वनिप्रदूषणाचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होवू लागला आहे. नागरिकांना रक्तदाब, चिडचिडेपणा, मानसिक संतुलन ढासळणे व बहिरेपणा येण्याची भीती व्यक्त केली जात असून याविषयी गांभीर्याने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
शहरातील ध्वनिप्रदूषणाचे वास्तव
ऐरोली व घणसोली निवासी क्षेत्रामध्ये ७३ डेसिबलची नोंद
वाशी हॉस्पिटलजवळ ६९ डेसिबलची नोंद
रहदारी क्षेत्रामध्ये दिघामध्ये ७० डेसिबलची नोंद
रबाळे व बेलापूरमध्ये ६९ डेसिबलची नोंद
शांतता क्षेत्रामध्ये रा. फ. नाईक विद्यालयजवळ ६५ डेसिबलची नोंद
>ध्वनी पातळीचे निकष पुढीलप्रमाणे
क्षेत्र डेसिबल
निवासी ५५
रहदारी ६५
शांतता ५०

Web Title: Sound effects dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.