दक्षिण नवी मुंबईला मिळणार हेटवणे धरणातून अतिरिक्त पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 01:05 AM2021-01-08T01:05:17+5:302021-01-08T01:05:24+5:30
सिडकोचा महत्त्वपूर्ण निर्णय : पाणी नियोजनासाठी समिती स्थापन
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई: दक्षिण नवी मुंबईतील सिडको वसाहती, उलवे, द्रोणागिरी आणि प्रस्तावित पुष्पकनगर आणि इतर प्रकल्पांच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ही समिती पाणीपुरवठा आणि स्रोत याचा अभ्यास करून सिडकोला अहवाल सादर करेल, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे.
पनवेल पालिका, सिडको कार्यक्षेत्रातील काही नोड, गावांना हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी हेटवणे धरणातून सिडकोला १५० एमएलडी पाणीसाठा उपलब्ध होत आहे. परंतु सध्याच्या स्थितीत हा पाणीसाठा अपुरा पडत आहे. त्यासाठी हेटवणे धरणातून १२० एमएलडी अतिरिक्त पाणीसाठ्याची तरतूद केली आहे. हा पाणीसाठा आरक्षित करण्यासाठी सिडकोने कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला ११९.८० कोटी रुपये शुल्क अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले.
पनवेल आणि उरण तालुक्याचा समावेश असलेल्या दक्षिण नवी मुंबईची लोकसंख्या २० लाखांच्या घरात गेली आहे. या भागातील तळोजा, रोडपाली, कामोठे, कळंबोली, उलवे, द्रोणागिरीत सिडकोकडून मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहेत. त्यामुळे भविष्यात येथे पाण्याची मागणी वाढणार आहे.
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, महागृहनिर्मित्ती, नैना क्षेत्र आदीमुळे २०५० पर्यंत या क्षेत्राची पाण्याची मागणी प्रतिदिनी १२७५ एमएलडी इतकी असेल, असा निष्कर्ष काढला जात आहे. पिण्याचे भविष्यकालीन नियोजन म्हणून हेटवणे धरणातून अतिरिक्त १२० एमएलडी पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील चार वर्षे या क्षेत्रातील प्रस्तावित प्रकल्पांना पाण्याची कमतरता भासणार नाही, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
जलवाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात
हेटवणे धरणातून सिडकोला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. यातील तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी सिडकोने हेटवणेच्या जलवाहिन्या भूमिगत करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी हमरापूर येथील टेकडीच्या खालूून बोगदा खणला जात आहे. या बोगद्याची लांबी ७०० मीटर इतकी असून त्यातून १५०० मीमी व्यासाची जलवाहनी टाकण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. पुढील महिन्यात हे काम पूर्ण होणार असून त्यानंतर सिडकोला मिळणाऱ्या एकूण पाणीपुरवठ्यात ३० एमएलडी पाण्याची वाढ होणार आहे.