- नारायण जाधवनवी मुंबई : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई आणि मुंबई महानगरीशी जोडणाऱ्या रेवस ते उरण नजीकच्या करंजा बंदराला जोडणाऱ्या सागरी पुलाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या पुलाचे कंत्राट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बहुचर्चित एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनीला दिले आहे. ही कंपनी बांधत असलेला बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील गंगा नदीवरील पूल काम पूर्ण होण्याआधीच कोसळला. यामुळे या कंपनीच्या राज्यातील सर्व कामांच्या चौकशीची मागणी होत आहे. त्यात या पुलाच्या कंत्राटाचाही समावेश आहे. एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनीला गोरेगाव - मुलुंड उन्नत मार्ग या ६ पदरी उड्डाणपुलाचे ६ अब्ज ६६ कोटी ६ लाख ७८ हजार इतक्या रकमेचे कंत्राट दिले आहे. संबंधित कंत्राट मागे घेण्याची मागणी काँग्रेसने महापालिका आयुक्त डॉ. आय. एस. चहल यांच्याकडे केली होती. त्यावर हे काम सुरूच राहील, असे आयुक्तांनी सांगितले होते.
१०० कोटी कमी दराने घेतले काम २.०४ किमी लांबीचा पूल बांधण्याचे ७९७ कोटी ७७ लाखांचे कंत्राट दिले आहे. त्यातील ११.१३ टक्के कमी दराने निविदा भरणाऱ्या एस.पी. सिंगलाचे कंत्राट मंजूर केले आहे. या कंत्राटाची मूळ किंमत ८९७ कोटी ६८ लाख इतकी असून, त्यापेक्षा एस.पी. सिंगलाने १०० कोटी कमी दराने ते घेतल्याने दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे.
हे सहा स्पर्धक होते कंत्राटदार एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन्स (एसपीएससीएल) ७९७.७७ काेटी लार्सन ॲण्ड टुब्रो ८७३.१० काेटी जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स ८८८.०० काेटी रेल विकास निगम लिमिटेड ९२२.५० काेटी ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर ११०२.५० काेटी अशोका बिल्डकॉन १२८९.७० काेटी
बिहारमध्ये गुन्हा दाखल गंगा नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच पूल कोसळल्याने त्याच्या बांधकाम दर्जाविषयी शंका उपस्थित करण्यात येत आहेत. या दुर्घटनेनंतर बिहार सरकारने एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनी विरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. यामुळे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने बिहारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कंपनीविरोधातील चौकशी पूर्ण होईपर्यंत रेवस-करंजाच्या कामास स्थगिती द्यावी किंवा कंत्राट रद्द करून नव्याने निविदा मागवाव्यात, अशी मागणी होत आहे.