एसपी सिंगलाचे रेवस-करंजा पुलाचे कंत्राटही वादाच्या भोवऱ्यात

By नारायण जाधव | Published: June 26, 2023 03:43 PM2023-06-26T15:43:57+5:302023-06-26T15:44:17+5:30

धरमतर खाडीत २.४ किमीचा आहे पूल : ७९८ कोटींचे आहे काम

SP Singla's Revas-Karanja bridge contract is also under controversy | एसपी सिंगलाचे रेवस-करंजा पुलाचे कंत्राटही वादाच्या भोवऱ्यात

एसपी सिंगलाचे रेवस-करंजा पुलाचे कंत्राटही वादाच्या भोवऱ्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई आणि मुंबई महानगरीशी जोडणाऱ्या रेवस ते उरण नजीकच्या करंजा बंदराला जोडणारा सागरी पुलाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कारण या पुलाचे बांधकामाचे कंत्राट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बहुचर्चित एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनीला दिले आहे. ही कंपनी बांधत असलेला बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवरील पूल काम पूर्ण होण्याआधीच कोसळला आहे. यामुळे या कंपनीच्या राज्यातील सर्व कामांची चौकशीची मागणी होत आहे. त्यात या पुलाच्या कंत्राटाचाही समावेश आहे.

एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनीला राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा गोरेगाव- मुलुंड उन्नत मार्ग, गोरेगाव हा ६ पदरी उड्डाणपुलाचे ६ अब्ज ६६ कोटी ६ लाख ७८ हजार इतक्या रकमेचे हे कंत्राट दिले आहे. मात्र, गंगा नदीवरील पूल कोसळल्यानंतर या दुर्घनटनेची पुनरावृत्ती टाळायची असेल तर एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत टाकून दक्षता समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांना दिले आहे. याच कंपनीला रस्ते विकास महामंडळाने धरमतर खाडीवरील रेवस - कारंजा दरम्यानच्या २.०४ किमी लांबीचा पूल बांधण्याचे ७९७ कोटी ७७ लाखांचे कंत्राट दिले आहे.

१०० कोटी कमी दराने घेतले काम
या पुलाच्या बांधकामासाठी एकूण सहा कंपन्या इच्छुक हाेत्या. त्यातील ११.१३ टक्के कमी दराने निविदा भरणाऱ्या एस.पी. सिंगलाचे कंत्राट मंजूर केले आहे. या कंत्राटाची मूळ किंमत ८९७ कोटी ६८ लाख इतकी असून त्यापेक्षा एस.पी. सिंगलाने १०० कोटी कमी दराने ते घेतल्याने त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

हे होते स्पर्धक सहा कंत्राटदार
एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन्स (एसपीएससीएल) ७९७.७७ कोटी
लार्सन अँड टुब्रो ८७३.१० कोटी
जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स ८८८.०० कोटी
रेल विकास निगम लिमिटेड ९२२.५० कोटी
ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर ११०२.५० कोटी
अशोका बिल्डकॉन १२८९.७० कोटी

दोन्ही पुलांमध्ये हे साम्य
बिहारच्या भागलपूर येथे गंगा नदीवरील निर्माणाधीन ४०० मीटर पूल कोसळला आहे. बिहारमधील पूल गंगा नदीवर बांधण्यात येत होता. तर रेवस-करंजा पूल खाडीवर बांधण्यात येत आहे. दोन्ही पूल पाण्यात बांधण्यात येत आहेत, हे यातील प्रमुख साम्य आहे.

बिहारमध्ये गुन्हा दाखल
गंगा नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच पूल कोसळल्याने त्याच्या बांधकाम दर्जाविषयी शंका उपस्थित करण्यात येत आहेत. या दुर्घटनेनंतर बिहार सरकारने एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनी विरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. यामुळे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने बिहारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कंपनीविरोधातील चौकशी पूर्ण होईपर्यंत रेवस-करंजाच्या कामास स्थगिती द्यावी, किंवा कंत्राट रद्द करून नव्याने निविदा मागवाव्यात, अशी मागणी होत आहे.

Web Title: SP Singla's Revas-Karanja bridge contract is also under controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.