सत्ताधाऱ्यांकडून समूह- संघटकांची बोळवण

By admin | Published: July 4, 2017 07:13 AM2017-07-04T07:13:24+5:302017-07-04T07:13:24+5:30

महापालिका आस्थापनेच्या विविध विभागांत ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या भूलथापा देणाऱ्या

Speaking from the ruling group- organizers | सत्ताधाऱ्यांकडून समूह- संघटकांची बोळवण

सत्ताधाऱ्यांकडून समूह- संघटकांची बोळवण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिका आस्थापनेच्या विविध विभागांत ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या भूलथापा देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना गेल्या दहा वर्षांपासून सरळ सेवेने भरती झालेल्या समूहसंघटकांचा मात्र विसर पडला आहे. केवळ आश्वासनांवर त्यांची बोळवण केली जात आहे. तर प्रशासनाने याप्रकरणी तोंडावर बोट ठेवले आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत अगदी अल्प मानधनावर काम करणाऱ्या या समूहसंघटकांची निराशा झाली आहे.
महापालिकेच्या समाज विकास विभागात एकूण २१ समूहसंघटक कार्यरत आहेत. त्यांची भरती सरळ सेवेने झालेली आहे. राज्यातील औरंगाबाद, सोलापूर आणि नाशिक महापालिकेने अशाच प्रकारे सरळ सेवेतून भरती केलेल्या समूहसंघटकांना विशेष ठराव करून सेवेत कायम केले आहे. त्याच धर्तीवर आम्हालाही सेवेत कायम करावे, अशी या २१ समूहसंघटकांची मागणी आहे. त्यासाठी त्यांचा दहा वर्षांपासून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे; परंतु केवळ आश्वासनावर त्यांची बोळवण केली जात आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या विविध विभागांत सुमारे ८३५ कर्मचारी ठोक मानधनावर काम करीत आहेत. त्यांना समान काम, समान वेतन धोरणानुसार वेतन श्रेणी लागू करण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांनी चाचपणी सुरू केली आहे. तर विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावर प्रशासनाला घेरले आहे.
गेल्या महिन्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी ठोक मानधनावरील या कर्मचाऱ्यांची वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात बैठक घेऊन त्यांना आश्वासित केले. या कर्मचाऱ्यांना समान काम, समान वेतन धोरणानुसार वेतनश्रेणी देण्याच्या दृष्टीने लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. तसेच शासकीय नियमांच्या अधीन राहून त्यांना सेवेत कायम करण्याच्या दृष्टीनेही आगामी काळात प्रयत्न केले जातील, असे नाईक यांनी या बैठकीत सांगितले. एकूणच नियमाने अडचणीचे असतानाही ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे सर्वंकष प्रयास सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहेत. तर दुसरीकडे कायद्याचा कोणताही अडथळा नसतानाही समूहसंघटकांना सेवेत कायम करण्याबाबत चालढकल केली जात आहे. त्यामुळे संघटकांत असुरक्षिततेची भावना पसरली आहे. दरम्यान, सफाई कामगार आणि ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना समान काम, समान वेतन धोरणानुसार वेतन देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. असे असले तरी आम्हाला सेवेत कायम करण्याच्या निर्णयावरही सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी समूहसंघटकांकडून करण्यात येत
आहे.

समूहसंघटकांची महत्त्वाची भूमिका
शहर स्वच्छता अभियानांतर्गत शहरातील स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण करण्यात आले.
समूहसंघटकांनी घरोघरी जाऊन माहिती संकलित केली. त्याशिवाय विविध घटकांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांचा प्रचार करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे समूहसंघटक करतात.

Web Title: Speaking from the ruling group- organizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.