स्वच्छतेसाठी महापालिकेस विशेष पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:57 PM2019-07-23T23:57:08+5:302019-07-23T23:57:16+5:30
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण : पालिकेच्या कामगिरीचे केले कौतुक
नवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविला आहे. या कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनाने विशेष पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१९’ मध्ये महानगरपालिकेने राष्ट्रीय पातळीवरील अमृत शहरांच्या प्रवर्गात सातवा क्रमांक मिळविला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये राष्ट्रीय मानांकन दोन क्र मांकांनी उंचावले आहे. राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान कायम राखला. देशातील अमृत शहरांमध्ये टॉप टेनमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. यामुळे राज्य शासनाच्या महाराष्ट्र नागरी विकास संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत महापालिकेचा गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार दिला. या वेळी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, या पूर्वीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. नेत्रा शिर्के, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त तुषार पवार उपस्थित होते.
महापौर जयवंत सुतार यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. यामध्ये सुजान आणि स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रि य सहभागाचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगत हा पुरस्कार नागरिकांना समर्पित केला. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांनी या दृष्टीने चांगले काम केल्याचा उल्लेख करीत या पुढील काळात राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वोत्तम तीन शहरांमध्ये येण्याचा प्रयत्न राहील असे महापौरांनी सांगितले. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कोणतेही यश संपादन करताना त्यामध्ये सांघिक भावनेचा मोठा सहभाग असतो, असे सांगत शहर स्वच्छतेकरिता सर्व लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी-कर्मचारी, सफाई कामगार तसेच नागरिकांनी एकात्म भावनेने दिलेल्या सक्रि य योगदानामुळेच नवी मुंबई महानगरपालिका नेहमी पुरस्कार प्राप्त करीत असते, असे सांगितले. आगामी स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये देशात पहिल्या तीन क्र मांकात नवी मुंबई शहर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व यासाठी सर्वांनी सज्ज होऊ या, असे आवाहन केले. या पूर्वीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सुरू केलेली स्वच्छतेची चळवळ पुढे सुरूच ठेवण्यात येईल, असेही स्पष्ट केले.