योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: दिवाळीच्या सुट्टीमध्ये शिबीराच्या माध्यमातून मुलामुलींचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी व त्यांचा बौध्दिक स्तर उंचविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने 'शालेय विदयार्थ्यांकरिता विशेष दिवाळी शिबीर' १८ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन कारण्यात आलेले आहे.
या शिबीरात व्यक्तिमत्व विकास, योगा व फिटनेस वर्ग, हस्तकला वर्ग, वत्कृत्व विकास, चित्रकला वर्ग, नाटय वर्ग, नृत्य वर्ग, बाल पुस्तक वाचन अशा प्रकारे विविध विषयांवरील उपक्रमांतून विदयार्थ्यांना समृध्द केले जाणार आहे. १८ ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रत्येक आठही विभागातील मध्यवर्ती ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळा सभागृहांमध्ये हे शिबीर दररोज साधारणत: २ तास संपन्न होणार असून यामुळे विदयार्थ्यांची दिवाळी सुट्टी आनंददायी होणार आहे तसेच त्यांच्या अंगभूत गुणांना चालना मिळणार आहे. आठ विभाग कार्यालय क्षेत्रातील शिबीराची ठिकाणे व तेथील वेळा समाजविकास विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये - बेलापूर विभागात नमुंमपा शाळा क्र. १ बेलापूर गाव (सकाळी ११:३० ते दुपारी १.००), नेरुळ विभागात नमुंमपा शाळा क्र. १४ व १५ शिरवणेगाव (सकाळी ०९:३० ते ११.००), वाशी विभागात नमुंमपा शाळा क्र. २८, शंकरराव विश्वासराव विदयालय वाशी (सकाळी ११:३० ते दुपारी ०१.००), तुर्भे विभागात नमुंमपा शाळा क्र. २४ तुर्भे स्टाअर्स (सकाळी ०९:३० ते ११), कोपरखैरणे विभागात नमुंमपा शाळा क्र. ११४/३१-३२, से-५ कोपरखैरणे (सकाळी ११:३० ते दुपारी १:००), घणसोली विभागात नमुंमपा शाळा क्र. ४२ घणसोली गाव (सकाळी ०९:३० ते ११), ऐरोली विभागात नमुंमपा शाळा क्र. ९१, सेक्टर-७, दिवा-ऐरोली (सकाळी ११:३० ते दुपारी ०१), दिघा विभागात बिंदुमाधवनगर बहुउद्देशीय इमारत, दिघा (सकाळी ०९:३० ते ११ ) अशा आठ ठिकाणी सदर शिबीरे संपन्न होणार आहेत. या शिबीराव्दारे मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना सुट्टीचा उपयोग करून घेता यावा, त्यांच्यामधील कला जोपासता यावी, त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, त्यांच्या विविध समस्या सोडविण्यास मदत व्हावी, त्यांच्यात एकमेकांत देवाण-घेवाण व्हावी व मदत करण्याची भावना तयार व्हावी, त्यांची तणावमुक्ती व्हावी तसेच त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी व संवेदनशीलता वाढीस लागावी हा उद्देश नजरेसमोर ठेवण्यात आलेला आहे.
वय वर्ष ६ ते १४ वयोगटातील मुले विहित नमुन्यातील अर्ज भरुन आपल्या विभागातील शिबीराचा लाभ घेऊ शकतात. याबाबतच्या अधिक माहितीसाठी बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे विभागातील मुलांनी दादासाहेब भोसले यांच्याशी ९३७२१०६९७६, ९८१९५५५२२० या भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा विभागातील मुलांनी दशरथ गंभीरे यांच्याशी ९७०२३०९०५४, ९००४७६१६४० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे. सध्याच्या ऑनलाईन युगात मोबाईलला व ऑनलाईन गेमला जोडली गेलेली मुले या शिबीराच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीतून करावयाच्या उपक्रमांशी जोडली जावीत व त्यांचा सर्वांगीण असा व्यक्तित्व विकास व्हावा यादृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या दिवाळी शिबीराचा लाभ जास्तीत जास्त मुलांनी करुन घ्यावा व पालकांनी आपल्या मुलांना त्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.