ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करताना विशेष काळजी घेणे गरजेचे, डॉक्टरांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 02:16 PM2022-12-26T14:16:07+5:302022-12-26T14:17:31+5:30
राज्यभरात करोना रुग्णांची संख्या कमी असली तरी चीन, जपान, ब्राझील, अमेरिका या देशांमध्ये करोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे.
नवी मुंबई: राज्यभरात करोना रुग्णांची संख्या कमी असली तरी चीन, जपान, ब्राझील, अमेरिका या देशांमध्ये करोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. सध्या आपल्याकडे असलेला ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
‘चीन आणि जपानमध्ये करोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. फुटबॉलच्या स्पर्धेमुळे जगभरातील नागरिक नुकतेच एका ठिकाणी आले होते आणि आता परत ते त्यांच्या देशांमध्ये परतले आहेत. या माध्यमातून संसर्ग प्रसार पुन्हा वाढण्याची शक्यता जास्त आहे. भारतामध्येही रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याने करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन पुन्हा सुरु करणे गरजेचे आहे. हाताची स्वच्छता आणि मास्कचा वापर यावर प्राधान्याने भर देणे आवश्यक आहे. लसीकरण झाल्यामुळे आपल्याकडे करोनाबाबत फारसे गांभीर्य राहिलेले नाही. परंतु आता परदेशात वाढणाऱ्या प्रसारामुळे पुन्हा सावधता बाळगणे गरजेचे आहे’ असे नवी मुंबईच्या मेडिकव्हर रुग्णाल्याचे कन्स्लटंट फिजिशियन डॉ. मनिष पेंडसे यांनी सांगितले.
एकीकडे थंडी वाढत असताना दुसरीकडे चीनमध्ये कोरोना रूग्ण वाढत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. ३१ डिसेंबर जवळ येत असल्याने अनेक लोक सुट्ट्यांची योजना आखतात. अशावेळी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा. याशिवाय ज्यांनी बुस्टर डोस घेतलेला नसेल त्यांनी तो लगेचच घ्यावा. हात न धुता तोंड, नाक, डोळे, कान यांना स्पर्श करू नका. सहलीला जाताना सोबत वयस्कर व्यक्ती आणि लहान मुले असल्यास शाल व गरम कपडे घ्या. ताप, अंगदुखी, खोकला, डोकेदुखी, पोटासंबंधी समस्या यासारख्या आजारांवरील औषधं सोबत बाळगा. विशेषत: तुम्ही लहान मुलांसोबत प्रवास करत असाल तर काही आवश्यक औषधे सोबत ठेवा. लहान मुलांना दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर सर्दी आणि फ्लू होतो. हे टाळण्यासाठी आवश्यक औषधे सोबत ठेवण्याचा सल्ला गोरेगावच्या एसआरव्ही रुग्णालयाचे फिजिशियन कन्सल्टंट डॉ अजित शेट्टी यांनी दिला आहे.
ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे ही लक्षणे दिसत असतील किंवा मधुमेहासारखे दीर्घकालीन आजार असल्यास किंवा याआधी न्युमोनियासारख्या आजारांची बाधा झाल्यामुळे फुप्फुसाला त्रास झाला होता तर या व्यक्तींनी प्रवास करण्यापूर्वी करोनाची चाचणी करून घेणे महत्त्वाचे आहे. ही चाचणी अधिकृत प्रयोगशाळांमध्ये करावी. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. पार्टी करताना रेस्टॉरंट, क्लब अशा गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे. सेलिब्रेशन करताना आपण आपला जीव धोक्यात तर घालत नाही ना याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. पेंडसे यांनी सांगितले.