नवी मुंबईत जनजागृतीसाठी कर्करोग दिनानिमित्त शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 11:59 PM2020-02-06T23:59:19+5:302020-02-06T23:59:55+5:30
महापालिकेचा उपक्रम
नवी मुंबई : कर्करोगाची वाढती समस्या लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात कर्करोग तपासणी आणि निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून, नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदासाठी मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई महानगरपालिका कर्करोगाविषयी जनजागृती व प्रत्यक्ष कार्यवाही करीत असून, समाज विकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई यांच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील १११ प्रभागांमध्ये महिलांसाठी विशेष कर्करोग तपासणी शिबिर राबविण्यात येत आहे व त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जागतिक कर्करोगदिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ. नवीन खत्री यांनी, स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये व नियमित तपासणी करण्याचा सल्ला दिला.
यावेळी अलका देवेंद्र भुजबळ यांच्या कर्करोग झाल्यापासून बरे होईपर्यंतच्या काळाचा आढावा घेणारा माहितीपट कॉमा प्रदर्शित केला. अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व विशद केले. समाज विकास विभागाच्या उपायुक्त क्रांती पाटील यांनी कर्करोग विषयक जाणीव जागृती व प्रत्यक्ष तपासणीकरिता राबविल्या जात असलेल्या उपक्र मांची माहिती दिली व उपक्र मांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक देवेंद्र भुजबळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला ओतुरकर, कार्यकारी अभियंता शुभांगी दोडे आदी उपस्थित होत्या.