विशेष मुलांनी साकारल्या ‘डिझायनर’ राख्या
By admin | Published: August 8, 2015 10:12 PM2015-08-08T22:12:40+5:302015-08-08T22:12:40+5:30
हातात कौशल्य आणि मनातला आत्मविश्वास या दोघांची सांगड घालून जगण्याच्या लढाईत कुठेही कमी पडणार नाही, हेच सीबीडीतील स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठान या विशेष मुलांच्या
- प्राची सोनवणे, नवी मुंबई
हातात कौशल्य आणि मनातला आत्मविश्वास या दोघांची सांगड घालून जगण्याच्या लढाईत कुठेही कमी पडणार नाही, हेच सीबीडीतील स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठान या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. या विद्यार्थ्यांनी सुंदर, आकर्षक अशा ४० डिझाईन्सच्या ५०० राख्या तयार केल्या आहेत.
या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पणत्या, कंदील, कागदी पिशव्या, दागिने अशा विविध वस्तू तयार केल्या आहेत आणि वस्तूंचे भव्य प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. शाळेतील फाल्गुनी व्होकेनशनल युनिटच्या वतीने या मुलांना वर्षभर विविध कलांचे प्रशिक्षण दिले जाते.
शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या या राख्यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. विविध शाळा, कॉलेज, कार्यालये, सामाजिक सांस्कृतिक संस्था, गृहनिर्माण संस्था, सोसायटींमध्ये या राख्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असून विशेष हातांनी तयार केलेल्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या मुलांनी एकदा काम हाती घेतले की त्यामध्ये ती एवढी मग्न होतात की त्यांना आजूबाजूच्या जगाचा विसरच पडतो. धागा ओवताना हातात सुई धरण्यापासून ते मणी ओवेपर्यंत संपूर्ण काम शिकविण्यासाठी शाळेच्या दहा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभते.
५०० राख्या बनविण्यासाठी या ४० विद्यार्थ्यांच्या या संघाला ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागला. समाजामध्ये ही मुले कुठेही कमी पडता कामा नये, या हेतूने त्यांना सक्षम करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम दरवर्षी राबविले जातात. सणांचे महत्त्व, त्यामागचा हेतू याची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी दिली जाते.