नवी मुंबईमध्ये पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी विशेष धोरण

By नामदेव मोरे | Published: July 4, 2023 06:04 PM2023-07-04T18:04:33+5:302023-07-04T18:04:58+5:30

नवी मुंबईमध्ये पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. वाहने उभी करण्यासाठी जागाच नसल्यामुळे रोडवर जिथे जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जात आहेत.

Special policy to solve parking problem in Navi Mumbai | नवी मुंबईमध्ये पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी विशेष धोरण

नवी मुंबईमध्ये पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी विशेष धोरण

googlenewsNext

नवी मुंबई : शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नियोजनबद्द पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. शहराचे पार्किंग धोरण निश्चीत करण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिकमधील नियोजनाचाही अभ्यास केला जाणार आहे. वाहतूक पोलीस व मनपा अधिकाऱ्यांची विभागनिहाय समिती स्थापन केली असून १२ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नवी मुंबईमध्ये पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. वाहने उभी करण्यासाठी जागाच नसल्यामुळे रोडवर जिथे जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जात आहेत. यामुळे अनेक ठिकाणी चक्काजामची स्थिती निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मनपा अधिकारी व वाहतूक पोलिसांच्या बैठका घेऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील पार्किंगच्या जागांचा सविस्तर आढावा घेतला जात आहे. नो पार्किंग झोन, सम- विषम पार्किंग, समांतर पार्किंग झाेन निश्चीत करण्याविषयी प्रशासनास सूचना देण्यात आल्या. ज्या ठिकाणी असे झोन आहेत त्या ठिकाणची सद्यस्थिती तपासण्याचे निर्देशही दिले आहेत. सद्यस्थितीमध्ये पार्किंग होत असलेल्या जागांवर भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये या करीता एक पथक निर्माण करण्यात यावे. रिक्षा व टॅक्सी स्टँडच्या जागा निश्चीत करण्यात याव्यात अशा सूचना दिल्या आहेत.

विभागनिहाय पार्किंगचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक विभागातील कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, विभाग अधिकारी व वाहतूक पोलीस विभाग, प्रादेशीक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असावा असे निश्चीत करण्यात आले आहे. १२ जुलैपर्यंत या समितीने अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई, पुणे व नाशिक महानगरपालिकेचे पार्किंग धोरण कार्यान्वीत आहे. त्यांचाही अभ्यास करण्यात यावा व पुढील बैठकीत त्याविषयी माहिती सादर करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. या बैठकीला मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, मालमत्ता विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर, वाहतूक पोलीस उपायुक्त तिरूपती काकडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Special policy to solve parking problem in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.