अपंगांच्या विशेष शाळा संहितेची अंमलबजावणी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:07 PM2020-09-29T23:07:55+5:302020-09-29T23:08:15+5:30

आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी : मनपाच्या ईटीसी केंद्राची चौकशी करण्याच्या सूचना, नियम राज्यभर लागू करण्यासाठी पाठपुरावा

The Special School Code for the Disabled should be implemented | अपंगांच्या विशेष शाळा संहितेची अंमलबजावणी व्हावी

अपंगांच्या विशेष शाळा संहितेची अंमलबजावणी व्हावी

googlenewsNext

नवी मुंबई : शासनाने अपंगांच्या विशेष शाळा, कर्मशाळा प्रशिक्षण केंद्र, संलग्न वसतिगृह, मतिमंद बालगृह, शिघ्र निदान व शिघ्र उपचार केंद्राकरिता सुधारित विशेष शाळा संहिता जुलै, २०१८ मध्ये लागू केली आहे. राज्यभर या संहितेची अंमलबजावणी करण्यात यावी, नवी मुंबई मनपाचे ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्रही या नियमाप्रमाणे चालविण्यात यावे, त्यास केंद्रऐवजी शाळेचा दर्जा देण्यात यावा व आतापर्यंतच्या कामकाजाची चौकशी करून चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.

महाराष्ट्र अपंगांच्या विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र संहिता २०१८ विषयी माहिती देण्यासाठी वाशीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेमध्ये मंदा म्हात्रे यांनी राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या नियमाविषयी सविस्तर माहिती दिली. नवी मुंबई महानगरपालिकेने ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. वास्तविक हे केंद्र म्हणजे अपंगांसाठीची शाळा आहे. परंतु ठरावीक अधिकाऱ्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी ते केंद्र असल्याचे भासविले. या केंद्रामध्ये मक्तेदारी निर्माण केली. आवाज उठविणाºया कर्मचारी व पालकांचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. पालकांना व कर्मचाºयांना न्याय देण्यासाठी आणि महानगरपालिकेच्या पैशाचा योग्य वापर व्हावा, यासाठी दोन वर्षांपूर्वी आवाज उठविला. तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली होती, परंतु त्यांनीही पालकांचे म्हणणे ऐकूण घेतले नाही. यानंतर, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रंजीत पाटील यांच्याकडे याविषयी निवेदन देण्यात आले. या पाठपुराव्याला यश आले व शासनाने जुलै, २०१८ मध्ये अपंगांच्या विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्रासाठी स्वतंत्र संहिता निर्माण केली.
शासनाच्या अपंगांच्या शाळा संहितेची राज्यभर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ती केल्यामुळे अपंगांच्या विशेष शाळा, कर्मशाळा प्रशिक्षण केंद्र, संलग्न वसतिगृह, मतिमंद बालगृह, शिघ्र निदान व शिघ्र उपचार केंद्रांमधील विशेष मुलांच्या शिक्षण व प्रशिक्षणामध्ये सुसूत्रता येणार आहे. हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. शासनाने १०६ पानांच्या आदेशामध्ये शाळा संहितेची सविस्तर माहिती दिली आहे. विशेष शाळा, निवासी विशेष शाळा, प्रशिक्षण केंद्र, विनाअनुदानित विशेष शाळा, कायम विना अनुदानित शाळा, मतिमंदांची बालगृहे व इतर सर्वांविषयी तपशीलवार माहिती दिली आहे. वयोगटाप्रमाणे विशेष शाळांचे वर्गीकरण कसे असणार, याची माहिती दिली. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी म्हात्रे यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये डॉ.राजेश पाटील, माजी नगरसेवक संपत शेवाळे, विजय घाटे, मनपाच्या ईटीसी केंद्रात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे पालक व इतर मान्यवर उपस्थित होते. छटर कल्ल्र३्रं३्र५ी

जनतेच्या पैशाचा योग्य वापर व्हावा : शहरातील विशेष मुलांना न्याय मिळाला पाहिजे. मनपाने शाळा संहितेप्रमाणे वयोगटाप्रमाणे शिक्षण देणारी शाळा चालवावी. जनतेच्या पैशाचा योग्य व काटेकोर वापर झाला पाहिजे. एका व्यक्तीची सुरू असलेली मक्तेदारी मोडीत निघाली पाहिजे. पालक व काही कर्मचाºयांवरही अनेक वर्षे अन्याय झाला आहे. त्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. चुकीचे काम करणाºयांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

चुकांना पाठीशी घालणाºयांची चौकशी करावी : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये ईटीसी केंद्राचाही समावेश आहे, परंतु या ठिकाणी चुकीच्या व मनमानी पद्धतीने कामकाज सुरू झाले होते. याविषयी पालकांनी वारंवार आवाज उठविला, परंतु त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. ईटीसीच्या स्थापनेपासूनच्या कामकाजाची चौकशी व्हावी, ज्यांनी चुकीचे काम केले असेल, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही आमदार म्हात्रे यांनी केली आहे.

सर्वांगीण विकास महत्त्वाचा : विशेष मुलांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा आहे. शासनाने केलेल्या शाळा संहितेमध्ये विशेष मुलांच्या प्रत्येक प्रवर्गासाठी कसा अभ्यासक्रम असावा, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. कर्णबधिर मुलांसाठी पूर्व प्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशी वर्गवारी केली आहे. पूर्व प्राथमिकमध्ये वाचनपूर्व कौशल्य, लेखनपूर्व कौशल्य, वाचा विकास, श्रवण विकास, सांकेतिक भाषेचा विकास, कारक कौशल्यांचा विकास, बोधात्मक क्षमतांचा विकास, अवधानखंड व एकाग्रता विकास, शारीरिक शिक्षण यांचा समावेश आहे. याच पद्धतीने प्रत्येक टप्प्यात अभ्यासक्रमाविषयी स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे.

दिव्यांगांची गैरसोय थांबविण्याची मागणी
नवी मुंबई महानगरपालिकेने वाशी रेल्वे स्टेशनच्या समोर ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. विशेष मुले व नागरिकांसाठीच्या सर्व योजनांचे काम येथूनच सुरू होते, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर, महानगरपालिकेने ईटीसी केंद्रात कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. ईटीसीचे कामकाज ऐरोली सेक्टर १५मध्ये हलविण्यात आले आहे. वास्तविक, कोविड केअर सेंटरसाठी शहरात मनपाच्या वापरात नसलेल्या अनेक इमारती होत्या. एपीएमसी व इतर आस्थापनांच्या वापरात नसलेल्या इमारती होत्या, असे असताना विशेष मुलांसाठीच्या केंद्रामध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करणे योग्य नव्हते. सद्यस्थितीमध्ये विशेष मुलांची गैरसोय होत असून,
ती गैरसोय तत्काळ दूर करण्यात यावी, अशी मागणीही मंदा म्हात्रे यांनी केली आहे.

कार्यवाही न झाल्यास हक्कभंग : नवी मुंबईमध्ये ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्रात विशेष शाळा संहिता लागू करावी. ईटीसी ही शाळा आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी काही व्यक्तींनी त्याला केंद्र असल्याचे भासविले आहे. विद्यमान आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पत्रव्यवहार करून शाळा संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. जर अंमलबजावणी झाली नाही, चुकीचे काम करणाºया अधिकाºयांवर कारवाई केली नाही व आतापर्यंतच्या कामाची चौकशी न केल्यास हक्कभंग आणणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शाळा संहितेची व्याप्ती : राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र अपंगांच्या विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र संहिता २०१८ तयार केली आहे. राज्यातील कायम विना अनुदानित, विना अनुदानित, अनुदानित अपंगांच्या विशेष शाळा, प्रशिक्षण केंद्र व संलग्न वसतिगृह, मतिमंद बालगृह, मतिमंदांकरिता कायमस्वरूपी आधारगृह, शीघ्र निदान व शीघ्र उपचार केंद्र, पुनर्वसन प्रकल्प या सर्वांना नवीन शाळा संहिता लागू होणार आहे.

तुकाराम मुंढेना प्रसिद्धीचा हव्यास

च्पत्रकार परिषदेमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांनी मनपाचे यापूर्वीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवरही तीव्र ताशेरे ओढले. मुंढे हे प्रसिद्धीचा हव्यास असणारे अधिकारी आहेत, प्रसिद्धीशिवाय त्यांना करमत नाही. लोकप्रतिनिधींविषयी पूर्वगृहदूषित दृष्टिकोन ठेवून वागतात.

च् नवी मुंबईमधील ईटीसी केंद्राविषयी समस्या सांगण्यासाठी पालक त्यांच्याकडे गेले होते, परंतु त्यांनी ऐकूणही घेतले नाही. आक्षेपांवर काहीही कार्यचाही केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकांनी मानले आभार
ईटीसी केंद्रात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे पालकही पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, आम्ही न्याय मिळावा, यासाठी मनपा प्रशासन व अनेक लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली होती, परंतु कोणी दखल घेतली नाही. आमदार मंदा म्हात्रे यांनी हा विषय लावून धरला. आम्हाला सहकार्य केले. पालकांनी यासाठी आभार मानले.

चुकीला माफी नाही
पालिकेच्या वतीने होणाºया विकासाच्या कामांमध्ये पारदर्शकता असावी.जनतेच्या पैशांचा योग्य वापर झाला पाहिजे. चुकीचे काम करणाºयांना पाठीशी घातले जाणार नाही. उद्यान विभागामधील अनागोंदी कारभाराविरोधात आवाज उठविला असून, इतर विभागांमध्ये चुकीचे काम झाल्यास स्वस्थ बसणार नाही, असे मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले. एकदा विषय घेतला की, तो पूर्णत्वास नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही स्पष्ट केले.

संहितेतील तरतुदीप्रमाणे विशेष शाळांची रचना
वर्ग रचना वयोगट
शीघ्र निदान व उपचार ० ते ३ वर्षे
शिशू वर्ग (प्ले ग्रुप) ३ ते ६ वर्षे
पूर्व पाथमिक ६ ते १२ वर्षे
प्राथमिक ८ ते १४ वर्षे
माध्यमिक १२ ते १६ वर्षे
व्यवसाय पूर्व १४ ते १८ वर्षे
 

Web Title: The Special School Code for the Disabled should be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.