नवी मुंबईतील बेजबाबदारांवर विशेष पथकांची राहणार नजर! १५५ जणांचा समावेश असलेली ३१ पथके कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 09:40 AM2021-03-20T09:40:11+5:302021-03-20T09:40:18+5:30
१६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एका दिवसातील कोरोना बाधितांच्या संख्येने ३०० चा आकडा पार केला असून, मागील तीन ते चार दिवसात कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिकेच्या १५५ जणांचा समावेश असलेली ३१ विशेष दक्षता पथकांची करडी नजर असणार आहे.
१६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एका दिवसातील कोरोना बाधितांच्या संख्येने ३०० चा आकडा पार केला असून, मागील तीन ते चार दिवसात कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता कोरोना सुरक्षा नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचे दिसून येत असून, बेजबाबदार नागरिकांवर महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. याकरिता प्रत्येक विभाग कार्यालयनिहाय पोलिसांसह दक्षता पथके नियुक्त करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच पोलिसांमार्फतही स्वतंत्ररित्या कारवाई केली जात आहे. तथापि या कारवाया लोकसंख्येच्या मानाने कमी असल्याने याकडे अधिक बारकाईने लक्ष केंद्रीत करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रत्येक पथकात ५ व्यक्ती अशा १५५ जणांची ३१ विशेष दक्षता पथके कार्यान्वित करण्याचे निश्चित केले आहे. ही विशेष पथके संपूर्ण महापालिका क्षेत्रातील कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवणार आहेत. प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात सकाळच्या सत्रासाठी १ व रात्रीच्या सत्रासाठी १ अशी २ पथके कार्यान्वित असणार आहेत.
विभाग कार्यालय क्षेत्रासाठी नियुक्त पथकांव्दारे लग्न व इतर समारंभ तसेच वर्दळीची ठिकाणे येथे कोरोना नियमांचे पालन होते की नाही, यावर बारीक लक्ष ठेवले जाणार असून, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आयुक्तांनी तातडीने ही प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. याशिवाय कोरोना प्रसाराचा सर्वाधिक धोका असणाऱ्या एपीएमसी मार्केट क्षेत्रासाठी ५ पथके तिन्ही शिफ्टमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर वॉच ठेवणार आहेत.
१५५ जणांचा समावेश असलेली ही विशेष दक्षता पथके कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी समर्पित भावनेने काम करणार आहेत. दंडात्मक रक्कम वसुलीपेक्षा नागरिकांना कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करण्याची सवय लागणे, हा पथके स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी कोरोनाचा वाढता धोका ओळखून गाफील न राहता सुरक्षा नियमांचे व त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे.
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका