मुंबई/ पनवेल - हार्बर रेल्वे मार्गावर बेलापूर स्थानकात २७ डिसेंबर व २८ डिसेंबर रोजी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. २७ डिसेंबरच्या (बुधवार-गुरुवार) मध्यरात्री २ वाजेपासून ते २८ डिसेंबर (गुरुवार-शुक्रवार) मध्यरात्री २ वाजेपर्यंत ४८ तासांचा ब्लॉक असणार आहे.
ब्लॉकच्या दोन्ही दिवशी प्रत्येकी ३४ फे-या रद्द केल्या आहेत. यात पनवेल-१८, नेरुळ-४, वाशी-१० आणि मानखुर्द-२ फे-यांचा समावेश आहे. ब्लॉकच्या दोन्ही दिवसांत या फे-या रद्द आहेत. ट्रान्सहार्बर वेळापत्रकानुसार धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. दरम्यान, मंगळवारच्या बिघाडामुळे हार्बर मार्गावरील १४ लोकल फे-या पूर्णत: आणि १६ लोकल फे-या अंशत: रद्द करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
२२ ते २५ डिसेंबरदरम्यान हार्बर मार्गावर बेलापूर-उरण काम पूर्ण करण्यासाठी चार दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. २५ डिसेंबरला ब्लॉक नियोजित वेळेपेक्षा तासभर लांबला. परिणामी, काम लवकर पूर्ण करण्याच्या नादात क्रॉस ओव्हरमध्ये ‘अॅडजेस्टमेंट’ करण्यात आली होती. याचा फटका बसल्यामुळे बेलापूर स्थानकाजवळ पेंटाग्राफचे नुकसान झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
सलग पाचव्या दिवशीही प्रवाशांचे हाल
22 ते 25 डिसेंबरदरम्यान हार्बर मार्गावर बेलापूर-उरण काम पूर्ण करण्यासाठी चार दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. सोमवारी दुपारी चार दिवसांचा विशेष ब्लॉक संपल्यानंतर लोकल फे-या सुरळीत होतील, अशी प्रवाशांची आशा फोल ठरली. मंगळवारी (26 डिसेंबर) सकाळी ‘पिक अव्हर’मध्ये बेलापूर स्थानकाजवळ लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाला. या बिघाडानंतर तब्बल चार तासांनी हार्बर डाऊन मार्गावर लोकल धावली. तर सायंकाळी ६च्या सुमारास रे रोड स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे अप दिशेला लोकलच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
बेलापूर स्थानकाजवळ सकाळी ९.४० मिनिटांनी डाऊन दिशेला जाणाºया लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. यामुळे पेंटाग्राफचे नुकसान झाले. तसेच ओव्हरहेड वायरदेखील तुटली. यामुळे ओव्हरहेड वायरमधील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. दरम्यान ९.४० ते ९.५५ वाजेपर्यंत अप मार्गावरील लोकलवरदेखील याचा परिणाम झाला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी कुर्ला स्थानकातून सकाळी १०.३० मिनिटांनी दुरुस्ती करणारी ‘टॉवर वॅगन’ बेलापूर दिशेला रवाना झाली. सकाळी ९.५५ वाजता अप मार्ग सुरू करण्यात आला तर दुपारी १.०२ मिनिटांनी बिघाड दुरुस्त करून डाऊन लोकल सुरू करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. यामुळे सुट्ट्यांमुळे प्रथम कामासाठी बाहेर पडलेल्या नोकरदार वर्गाचा मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला.
तथापि, बिघाड दुरुस्ती झाल्यावरही रेल्वे गाड्या पुढे सरकल्या नव्हत्या. प्रत्यक्ष लोकल फे-या सुरळीत होण्यास विलंब झाला. हा बिघाड दुरुस्त झाल्यानंतर हळूहळू लोकल फे-या वेळापत्रकानुसार चालवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केला. मात्र सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ‘रे रोड’ स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पुन्हा हार्बर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.