उरण : वारंवार बंद पडणाऱ्या बोटी, पावसाळी हंगाम आणि इतर कारणे पुढे करीत मोठा गाजावाजा करून प्रवाशांसाठी मोरा - भाऊचा धक्कादरम्यान सुरू करण्यात आलेली स्पीड बोट सेवा १५ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. स्पीड बोट सेवा चालविणाºया आर. एन. शिपिंग कंपनीने घेतलेल्या या मनमानी निर्णयामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. भाऊचा धक्का - मोरा या सागरी मार्गावरून दररोज हजारो प्रवासी आणि कामगार प्रवास करतात.सागरी मार्गावरील ५० वर्षांपासून चालत असलेल्या जुनाट प्रवासी बोटी मोरा हे ९ किमी सागरी अंतर कापण्यासाठी तासाभराचा अवधी घेतात. या सागरी प्रवासादरम्यान प्रवाशांना अनियमित सेवेचा सामना करावा लागतो. त्याशिवाय कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. मोरा सागरी मार्गावरून पावसाळी हंगामात हवामानाच्या आणि मालक, कर्मचाºयांच्या लहरीवरच प्रवासी बोटी सोडल्या जातात. पावसाळी हंगामात मोरा जलमार्गावरील तिकीट दरात दरवर्षी १० ते १५ रुपयांपर्यंत तिकीट दरात वाढ केली जाते. ही तिकीट दरवाढ कित्येक वेळा इंधनवाढीचे कारण पुढे करीत नंतर कायम केली जाते. या सागरी मार्गावर मागील ५० वर्षांपासून खासगी लाँच मालकांचीच मक्तेदारी आहे. लाँच मालकांची असलेली मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी मोरा सागरी मार्गावर स्पीड बोटीने प्रवासी वाहतूक करण्यासाठी आर. एन. शिपिंग कंपनीला परवानगी देण्यात आली आहे.केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपाच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत भाऊचा धक्का येथे या स्पीड बोट सेवेचा दोन वर्षांपूर्वी शुभारंभही करण्यात आला होता. त्यामुळे सुरू करण्यात आलेल्या स्पीड बोटीमुळे ४० मिनिटात मुंबई गाठणे शक्य झाले होते.स्पीड बोट सेवा विविध कारणांमुळे प्रवासी वाहतूक खंडित होण्याचे प्रकार घडू लागले होते. कधी इंजिनमध्ये बिघाड तर कधी दुरुस्तीसाठी होणारा विलंब, कधी खराब हवामान तर कधी समुद्राच्या ओहोटीमुळे जेट्टीला बोटी लागणे अशक्य होत असल्याने स्पीड बोटी प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात येत होत्या.आता तर आर. एन. शिपिंग कंपनीने मोरा-भाऊचा धक्का दरम्यान सागरी प्रवासी वाहतूक १६ जूनपासून बंद ठेवण्यात येत असल्याचे लेखी पत्रच बंदर विभागाकडे दिले आहे. यामध्ये स्पीड बोटीची डागडुजी, समुद्राच्या ओहोटीमुळे उद्भवणारी चढ-उताराची आणि गाळाची समस्या आदी कारणे देण्यात आल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक पी. बी. पवार यांनी दिली.
स्पीड बोट वाहतूक सेवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 1:48 AM