खारकोपर लोकलमुळे उलवेत विकासाला गती, रिअल इस्टेटला उठाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 04:48 AM2018-12-24T04:48:37+5:302018-12-24T04:49:12+5:30
नेरूळ-खारकोपर लोकल सेवेमुळे उलवेसह परिसरातील रियल इस्टेटला चांगले दिवस आले आहेत. इतकेच नव्हे, तर सक्षम प्रवासी सेवा उपलब्ध झाल्याने या क्षेत्रातील लोकसंख्याही वाढू लागली आहे.
नवी मुंबई - नेरूळ-खारकोपर लोकल सेवेमुळे उलवेसह परिसरातील रियल इस्टेटला चांगले दिवस आले आहेत. इतकेच नव्हे, तर सक्षम प्रवासी सेवा उपलब्ध झाल्याने या क्षेत्रातील लोकसंख्याही वाढू लागली आहे. एकूणच नेरूळ-खारकोपर लोकल सेवेमुळे या क्षेत्राच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे.
सिडकोने उलवे नोडची उभारणी केली. या नोडमध्ये अनेक प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले. त्यामुळे या क्षेत्रातील भूखंडांचे दर वाढले. उलवे नोडचा संभाव्य विकास लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी या क्षेत्रात मोठ्याप्रमाणात गुंतवणूक केली. साडेबारा टक्के योजनेअंतर्गतच्या भूखंडाचे ट्रेडिंग वाढले. त्यामुळे या भूखंडांनीही कोटीची उड्डाणे घेतली. विशेष म्हणजे मागील दहा वर्षांत या परिसरातील रियल इस्टेट क्षेत्रात मोठी उलाढाल झाली. खासगी विकासकांनी अनेक मोठमोठे प्रकल्प प्रस्तावित केले. काही ठिकाणी भूमिपूजनही झाले, तर काहींचे प्रत्यक्षात कामही सुरू झाले. मात्र पायाभूत सुविधांअभावी येथील मालमत्तांचे दर स्थिर राहिले. त्यामुळे बड्या विकासकांसह गुंतवणूकदारांचे कंबरडे मोडले. यातच सिडकोने या विभागात उन्नती हा गृहप्रकल्प साकारला. त्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण होतील, असा आशावाद बांधकाम व्यावसायिकांत निर्माण झाला. परंतु आंतरराष्ट्रीय विमानतळ व मेट्रोसारख्या प्रकल्पांना झुकते माप देणाऱ्या सिडकोला या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा पुन्हा विसर पडला. त्यामुळे उन्नती प्रकल्पात राहावयास गेलेल्या चाकरमान्यांची कसरत सुरू झाली. नाले, गटारे, दिवाबत्ती, पिण्याचे पाणी, रस्ते तसेच वाहतुकीची साधने आदींचा अभाव असल्याने येथील रहिवाशांना कमालीची कसरत करावी लागली. विशेष म्हणजे या क्षेत्रात घरे व दुकाने खरेदी केलेल्यांची मोठी पंचाईत झाली. लोकवस्तीच नसल्याने या मालमत्ता पडून राहिल्या. एनएमएमटीने या भागात बसेसच्या काही फेºया सुरू केल्याने त्याचा काही प्रमाणात दिलासा मिळाला. त्यामुळे बहुप्रतीक्षित नेरूळ-उरण लोकल सेवेची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर गेल्या महिन्यात या मार्गाच्या खारकोपरपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. पहिल्या टप्प्यात बेलापूर ते खारकोपर आणि नेरूळ ते खारकोपर अशा सेवा सुरू झाल्याने या परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा परिणाम म्हणून मागील महिनाभरात या परिसरातील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व भाडेकराराचे प्रमाणही वाढले आहे. इतकेच नव्हे, तर अनेक गृहसंकुलात कुलूप बंद असलेले वाणिज्यिक गाळ्यातून लहान-मोठे व्यवसाय सुरू झाल्याचे दिसून आले आहे. स्थानक परिसरात फेरीवाले, हातगाडी व इतर लहान व्यावसायिकांची संख्या वाढू लागली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून मागील दहा वर्षांपासून स्थिर राहिलेल्या येथील स्थावर मालमत्तेने आता उठाव घ्यायला सुरूवात केल्याने बांधकाम व्यावसायिक तसेच गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले आहे.
पायाभूत सुविधांवर भर
सिडकोने या क्षेत्रात पायभूत सेवा निर्माण करण्यावर भर दिला आहे. रस्ते, नाले, गटारे, दिवाबत्ती, सांडपाणी प्रक्रिया करणारे केंद्र, शाळा, उद्याने, खेळाची मैदाने, पेट्रोल पंप आदीबाबत कार्यवाही सुरू केली आहे.
नागरी सुविधांची कोट्यवधींची कामे या विभागात सुरू आहेत. नेरूळ-उरण मार्गाचा दुसरा टप्पा पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचा निर्धार सिडको व मध्य रेल्वेने व्यक्त केला आहे. त्यानुसार कामाला गती देण्यात आली आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुद्धा प्रगतिपथावर आहे. या पार्श्वभूमीवर उलवेसह नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या पुष्पकनगर नोडमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे.