पनवेल : पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या १६ आॅक्टोबर रोजी होत असून प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. मतदानाची तारीख जवळ आल्याने उमेदवार प्रचारात हिरिरीने सहभागी होत असून ऊन-पावसाची तमा न बाळगता कार्यकर्ते प्रचार करत आहेत.तालुक्यात ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सोमवार, १६ आॅक्टोबर रोजी पार पडत आहेत. तालुक्यातील चिंध्रण, वाघिवली,शिरढोण, शिवकर, कानपोली, करंजाडे, भाताण, नितळस, केळवणे, नेरे, दिघाटी या ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी थेट निवडणूक होत आहे. त्यामुळे सरपंच होण्यासाठी एकूण सदस्य संख्येवर अवलंबून राहण्याची गरज नाही. सरपंचपदाचे उमेदवारही स्वत:साठी मते मागताना फिरताना दिसत आहेत. तरी काही ठिकाणी नात्यांमध्येच विरोधात निवडणुका लढविल्या जात आहेत. शेकाप व भाजपा या दोन प्रमुख पक्षांमध्ये ही लढत होत आहे. यामुळे या निवडणुकीत कोण विजय मिळवतोय याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.निवडणुका पार पाडण्यासाठी केवळ तीन दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे उमेदवार व त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते परिसर पिंजून काढत आहेत, आपल्या पक्षाची मते न फुटण्यासाठी एकमेकांवर लक्ष ठेवले जात आहे. १७ आॅक्टोबर रोजी निकाल आहे.
पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 3:04 AM