उलवे टेकडीच्या सपाटीकरणाला वेग

By admin | Published: June 17, 2017 02:16 AM2017-06-17T02:16:57+5:302017-06-17T02:16:57+5:30

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवे टेकडीच्या सपाटीकरणाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

The speed of the level of Uleve Hill | उलवे टेकडीच्या सपाटीकरणाला वेग

उलवे टेकडीच्या सपाटीकरणाला वेग

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवे टेकडीच्या सपाटीकरणाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. शुक्रवारपासून टेकडीवर सुरुंग पेरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १३00 सुरुंग पेरले जाणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवड्यात प्रत्यक्षात स्फोट घडवून टेकडीचे उत्खनन केले जाणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार सिडकोने विमानतळपूर्व कामे हाती घेतली आहेत. यात उलवे टेकडीची उंची कमी करणे, गाढी नदीचा प्रवाह बदलणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदी प्रमुख कामांचा समावेश आहे. तब्बल दोन हजार कोटी रुपयांच्या या कामासाठी पात्र ठरलेल्या कंत्राटदारांना अलीकडेच वर्कआॅर्डरही देण्यात आल्या आहेत. उलवे टेकडीच्या सपाटीकरणाचे काम अत्यंत जोखमीचे आहे. ९२ मीटर उंचीच्या या टेकडीची छाटणी करून ती ८ मीटरपर्यंत आणली जाणार आहे. त्यासाठी स्फोटकांचा वापर केला जाणार आहे. झारखंड येथील सीआयएमएफआर या तज्ज्ञ संस्थेच्या देखरेखीखाली टेकडी कापण्याचे काम केले जाणार आहे. त्यानुसार या संस्थेच्या तज्ज्ञांनी सोमवारी टेकडीची पाहणी केली. त्यानंतर गुरुवारी कामाचे भूमिपूजन करण्यात आले, तर शुक्रवारपासून टेकडीवर सुरूंग पेरण्याचे काम हाती घेण्यात आले असून दोन-तीन दिवसांत सुरूंग पेरण्याचे काम पूर्ण होईल. टेकडीची उंची ९ मीटरने कमी होईपर्यंत स्फोटाची ही प्रक्रिया सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती सिडकोचे मुख्य जनसपंर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी दिली.

स्फोटाच्या कालावधीत प्रवेश निषिद्ध
उलवे टेकडीचे उत्खनन करण्यासाठी अंतराअंतराने जवळपास १३00 स्फोट घडवून आणले जाणार आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात दगडाचे तुकडे हवेत उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाला काही इजा होवू नये, या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. त्यानुसार स्फोटाच्या काळात या परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

उत्खननासाठी
दोन वर्षे लागणार
उलवे टेकडीच्या उत्खननाचे काम अत्यंत जोखमीचे आहे. त्यामुळे या कामाला दीड ते दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे. हे काम सुरू असतानाच गाढी नदीचे पात्र बदलण्याचे कामही हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी गार्बियन भिंत उभारली जाणार आहे. तर टेकडीच्या उत्खननातून २ कोटी ७५ लाख क्युबिक मीटर इतका खडक बाहेर पडणार आहे.

पुरातन गुंफा होणार नामशेष
उलवे टेकडीवर लहान- मोठ्या पुरातन गुंफा आहेत. स्फोटामुळे हा ऐतिहासिक ठेवा नामशेष होणार आहे.
असे असले तरी केंद्रीय पुरातत्व विभागाने या टेकडीवरील गुंफांना पुरातत्व मूल्य नसल्याचा निर्वाळा देत टेकडीच्या उत्खननाला रीतसर परवानगी दिली आहे.
ही परवानगी प्राप्त झाल्यानंतरच सिडकोने टेकडीच्या उत्खननाचे काम हाती घेतले आहे.

Web Title: The speed of the level of Uleve Hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.