मेट्रोच्या कामाला पुन्हा गती; नवीन चार कंत्राटदारांची नेमणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 12:34 AM2018-12-11T00:34:09+5:302018-12-11T00:34:30+5:30

कंत्राटदारांनी निर्माण केलेल्या न्यायालयीन वादामुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे.

The speed of the metro works again; New four contractor appointments | मेट्रोच्या कामाला पुन्हा गती; नवीन चार कंत्राटदारांची नेमणूक

मेट्रोच्या कामाला पुन्हा गती; नवीन चार कंत्राटदारांची नेमणूक

Next

- कमलाकर कांबळे 

नवी मुंबई : कंत्राटदारांनी निर्माण केलेल्या न्यायालयीन वादामुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सिडकोने आता नवीन कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. त्यानुसार संबंधित कंत्राटदारांनी मागील आठवड्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आॅक्टोबर २0१९ पर्यंत मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला आहे.

सिडकोने २०११ मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तीन टप्प्यांत हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यासाठी चार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. मात्र, विविध कारणांमुळे या कामाची गती मंदावली आहे. पहिल्या टप्प्याचे काम रखडल्याने उर्वरित दोन टप्पेसुद्धा रखडले आहेत, त्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. पहिल्या टप्प्यात बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या ११ किमी अंतरावरील उन्नत मार्ग, पेंधर येथील कारशेड उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु कंत्राटदारांच्या वादामुळे स्थानकांचे काम मागील सहा वर्षांपासून रखडले आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. यापार्श्वभूमीवर रखडलेल्या मेट्रोच्या कामालाही गती देण्यात येत आहे. त्यानुसार सॅजोन्स, सुप्रीम आणि महावीर या तीन भागीदार कंपन्यांची हकालपट्टी करून रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी नवीन कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. या कंत्राटदारांनी कामाला सुरुवातही केली आहे. नवी मुंबई विमानतळावरून डिसेंबर २0१९ मध्ये विमानाचे पहिले टेकआॅफ होण्याची शक्यता आहे. परंतु उड्डाणापूर्वीच मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्धार सिडकोने केला आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या तीन टप्प्यांचा तपशील
बेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्प्याच्या ११ कि.मी. लांबीच्या मार्गासाठी सुरुवातीच्या काळात दोन हजार कोटी रुपये खर्च अंदाजित करण्यात आला होता. दुसरा टप्पा ८.३५ कि.मी. लांबीचा आहे. तळोजा एमआयडीसी-कळंबोली-खांदेश्वर मार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. पहिल्या दोन टप्प्यांना जोडण्यासाठी तिसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. हा टप्पा केवळ दोन कि.मी. लांबीचा असून, त्यासाठी ५७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे; परंतु पहिलाच टप्पा पाच वर्षे रखडल्याने उर्वरित दोन टप्प्यांचे कामही लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या एकूण खर्चात दुपटीने वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

उर्वरित दोन टप्प्यांसाठी चाचपणी
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मेट्रो प्रकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण तीन टप्प्याच्या माध्यमातून मेट्रो थेट विमानतळाला जोडली जाणार आहे. मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी आता आॅक्टोबर २०१९ ची डेडलाइन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा विमानतळाला काहीच उपयोग होणार नाही. उर्वरित दोन टप्प्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय मेट्रोची व्यवहार्यता सिद्ध होणार नाही. ही बाब ओळखून पहिल्या टप्प्याबरोबरच उर्वरित दोन टप्प्याच्या कामालाही गती देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे असले तरी ते गरजेचे आहे. त्या दृष्टीने चाचपणी सुरू केल्याची माहिती लोकेश चंद्र यांनी ‘लोकमत’ला दिली.

नव्या चार कंत्राटदारांवर जबाबदारी
बेलापूर ते पेंधर या ११ किमी लांबीच्या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. या सर्व स्थानकांची कामे रखडली आहे. ती पूर्ण करण्यासाठी स्थानक १ ते ६ क्रमांकाच्या स्थानकांसाठी प्रकाश कन्सोरियम कंपनीला १२७ कोटी रुपयांचा ठेका दिला आहे. तर स्थानक क्रमांक ७ ते ८ पूर्ण करण्यासाठी २८ कोटींचा ठेका बिल्ड राईड कंपनीला दिला आहे.
८ आणि ११ क्रमांकाच्या स्थानकाच्या कामासाठी युनिवास्तू कंपनीला ४३ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. तर १0 क्रमांकाचे स्थानक पूर्ण करण्यासाठी जे. कुमार कंपनीला ५३ कोटी रुपयांचे काम देण्यात आले आहे. या चार कंत्राटदार कंपन्यांना काम पूर्ण करण्याची कालमर्यादा आहे.

Web Title: The speed of the metro works again; New four contractor appointments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.