पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालय उभारणीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत नवीन पनवेल सेक्टर १६ मधील भूखंड क्रमांक ४ वर होणाऱ्या पालिका मुख्यालयाचे बांधकाम व सर्व आराखडे, तसेच अंदाज प्रक्रियेच काम पाहणाकरिता मे हितेन सेथी अँड असोसिएट्स या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. सभापती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली फडके नाट्यगृहात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही सभा पार पडली.
या सभेत स्थायी समितीने ३ कोटी ४७ लाख रुपयांच्या आर्थिक बोलीला मान्यता दिली आहे. पनवेल महानगरपालिकेचे स्वराज्य नामक मुख्यालय नवीन पनवेल या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. याकरिता सिडकोकडून २८ कोटी रुपयांचा भूखंड घेण्यात आला असून, ते पैसे पालिकेने अदा केले आहेत. वास्तुविशारद व सल्लागाराची नेमणूक केल्यानंतर मुख्यालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.सध्याच्या घडीला पालिकेचे मुख्यालय हे नगरपरिषदेशी जुनी इमारत व त्याच्या बाजूला असलेल्या आणखी एक इमारत जोडून तयार करण्यात आले आहे. पनवेल शहरातील देवाळे तलावाशेजारी हे मुख्यालय आहे.
पनवेल महानगरपालिकेचा पुढील वर्षाचा विचार करून शहरासाठी सीडीपी (व्हिजन डॉक्युमेंट ) तयार करण्यात आला आहे. याकरिता क्रिसिल रिस्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन लि. या कंपनीला काम देण्यात आले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या बाबी या सीडीपीमध्ये समाविष्ट असणार आहत्त. म्हणूनच या आराखड्याला ‘व्हिजन डॉक्युमेंट’ नाव देण्यात आले आहे. कंपनीने लावलेल्या ४ कोटी ५१ लाखांच्या आर्थिक बोलीला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
पालिका क्षेत्रातील विविध रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र, सर्व्हेचे काम पाहणारे शिक्षक आदींचा कोरोनापासून बचावासाठी ट्रिपल लेयर मास्क खरेदीला स्थायी सभेत परवानगी देण्यात आली आहे. ५० हजार मास्क खरेदीसाठी ४ लाख २० हजारांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.
कोरोनाने मृत्युमुखी पावल्यास रुग्णांच्या अंत्यविधीसाठी येणारा खर्च पालिकेच्या माध्यमातून खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला गॅस दाहिनी चालू असल्यास २,५०० रुपये तर गॅस दाहिनी बंद असल्यास लाकडांवर अंत्यविधी केल्यास ५ हजार रुपयांपर्यंत खर्च येत आहे. या विषयालाही मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती सभापती प्रवीण पाटील यांनी दिली.