अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीपनवेल आरटीओ कार्यालयात सारथी ४ व वाहन ४ या अत्याधुनिक प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. मात्र, सर्व्हर धिम्या गतीने सुरू असल्याने आॅनलाइन अर्ज भरण्याकरिता तासन्तास लागतात. त्यामुळे पूर्वीचीच यंत्रणा चांगली होती, असे मत वाहतूकदार तसेच नवीन वाहनखरेदी करणाऱ्यांकडून नोंदविण्यात येत आहे. पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारित पनवेल, पेण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालये येतात. पनवेल कार्यालयात वाहनांची नोंद, वाहन परवाने घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांना याकरिता सातत्याने कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. पैसे भरण्याकरिता रांगेत उभे राहावे लागते. कामाचा उरक होत नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. तसेच कार्यालयात तुलनेत मनुष्यबळ कमी असल्याने कर्मचाऱ्यांवरही ताण येतो. जमा झालेल्या रकमेचा भरणा करणे, पावत्या देणे यांसारखी अनेक कामे करावी लागतात. त्यामुळे सारथीची जोडणी झाल्यावर सर्व कामे जलद गतीने होतील, तसेच कामाचा ताण कमी होईल, असा दावा करण्यात येत होता. मात्र, हा दावा अवघ्या नऊ दिवसांत फोल ठरला आहे. नॅशनल इन्फोमेटिक्स सेंटर या एजन्सीच्या माध्यमातून बसविण्यात आलेले हे वेबपोर्टल खूपच धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहन परवाने, वाहननोंदणी, वाहन हस्तांतरण नोंदणी यांसारख्या कामांना विलंब होत असून, आॅनलाइन अर्ज भरणेही कठीण झाले असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
आरटीओच्या ‘सारथी’चा वेग मंदावला
By admin | Published: February 13, 2017 5:16 AM