नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमीपूजन १२ जानेवारीला होत आहे. या निमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार असल्यामुळे महामार्गासर उलवे परिसरामध्ये स्वच्छतेच्या कामांना वेग आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनेही समन्वयक अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्यावर स्वच्छतेसह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
न्हावा शेवा शिवडी सागरी मार्ग, मेट्रो, दिघा स्टेशन व उरण रेल्वे मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्यामुळे बंदोबस्तासह सार्वजनीक सुविधा पुरिवण्यासाठी शासकीय यंत्रणांनी विविध कामे सुरू केली आहेत.
सायन - पनवेल महामार्ग, जेएनपीटी रोड, पनवेलकडून कार्यक्रम स्थळांकडे जाणारा रस्त्यासह उलवे नोडची साफसफाई केली जात आहे. महामार्गावरील धूळही साफ केली जात आहे. कुठेही कचरा आढळणार नाही याची काळजी घेतली जात आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांना वैद्यकीय सुविधा, पाणी व इतर आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेवरही स्वच्छतेसह आवश्यक सुविधा देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेसह इतर कामे सुरू करण्यात आली आहेत.
समन्वयक अधिकारी व त्यांच्यावरील जबाबदारीवैद्यकीय सुविधा - डॉ. प्रशांत जवादे यांच्य नियंत्रणाखालील टीमवर कार्यक्रमाच्या ठिकाणी वैद्यकीय पथक, रुग्णवाहीका पुरिवणे व सर्व प्रकारची आरोग्यविषयी सुविधा देण्याची जबाबदारी दिली आहे.
स्वच्छतेकडे लक्ष - कार्यक्रमाच्या ठिकाणी व परिसरातील रस्त्यांची साफसफाई करण्यासाठीची जबाबदारी घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या मार्गदर्शनाखालील समितीकडे सोपविली आहे.
परिवन सेवा - कार्यक्रमाच्या मार्गावर बसेस उपलब्ध करून देण्याची व त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी परिवहन उपायुक्त योगेश कडूस्कर यांच्यावर सोपविली आहे.
फिरते शौचालय - कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरते शौचालय पुरविणे, त्यांची स्वच्छता ठेवणे, सक्षण युनिट, जेट मशीनची व्यवस्था करण्याची जबाबदारी उपायुक्त सोमनाथ पोटरे व श्रीराम पवार यांच्यावर सोपविली आहे.
रस्त्यांची दुरूस्ती व रंगरंगोटी - पंतप्रधान व इतर मान्यवर येणाऱ्या व जाणाऱ्या मार्गांची दुरूस्ती केली जाणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी रंगरंगोटी केली जाणार असून ही जबाबदारी कार्यकारी अभियंता अजय संखे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.