नवी मुंबई :सिडकोच्या माध्यमातून विविध नोडमध्ये उभारण्यात येत असलेले गृहप्रकल्प सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने या प्रकल्पांच्या कामांना गती द्या, असे निर्देश सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सिडकोच्या माध्यमातून गृहप्रकल्पांसह विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे सुरू आहेत. परंतु, विविध कारणांमुळे या कामांची गती मंदावली आहे. व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे हाती घेताच सिंघल यांनी सर्वप्रथम या प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रकल्पांना भेट देऊन आढावा घेतला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिंघल यांनी गुरुवारी मानसरोवर, नावडे व तळोजा येथे सुरू असलेल्या गृहप्रकल्पांच्या कामांची पाहणी केली. हे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला वेग देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला केल्या. त्यानंतर सिंघल यांनी सेंटर ऑफ एक्सलन्स, सेंट्रल पार्क, खारघर - तुर्भे बोगदा जोड मार्ग, खारघर गोल्फ कोर्स आणि खारघर गृहनिर्माण प्रकल्प या प्रकल्प स्थळांना भेट देऊन आढावा घेतला. त्यानुसार संबंधित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या.
याप्रसंगी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, दिलीप ढोले, मुख्य अभियंता एन. सी. बायस, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ शीला करुणाकरन आदीसह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांना उत्तम दर्जाची घरे निर्धारित वेळेत उपलब्ध करून देण्याचा देण्यावर सिडकोचा भर आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईला जागतिक दर्जाची क्रीडा नगरी बनवण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फुटबॉल स्टेडियम व खारघर व्हॅली गोल्फ कोर्सचा विस्तार या प्रकल्पांना गती देणे तितकेच आवश्यक आहे. खारघर-तुर्भे बोगदा जोड मार्ग हा प्रकल्प परिवहन व कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यानुसार संबधित प्रकल्पांच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने प्रयत्न असल्याचे विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.